सिडको महामंडळाच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत शनिवार 15 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. ही सोडत रायगड इस्टेट, फेज 1, भूखंड क्र. 1, सेक्टर-28, तळोजा पंचानंद इथं होणार आहे. सकाळी 11.00 वाजता ही सोडत पार पडणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर करण्यात येणार असल्याची माहिती सिडको प्रशासनाने दिली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडकोने 12 ऑक्टोबर 2024 ला "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता 26,000 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. अर्जदारांना आपल्या पसंतीच्या 15 सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
15 फेब्रुवारीला होणाऱ्या या सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर देखील करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या पाहू शकतात. सोडतीमधील यशस्वी उमेदवारांची यादी lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरे आहेत. त्याची लॉटरी 15 तारखेला लागणार आहे. त्यामुळे या लॉटरीच्या माध्यमातून किती जणांचे स्वप्नातल्या घराचे स्वप्न साकार होते ते समजणार आहे. त्यामुळे या लॉटरीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या योजनेला सुरूवातील चांगली प्रतिसाद मिळाला होता. पण घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर आहेत तेवढ्या घरांसाठीही अर्ज आले नाहीत. 26,000 घरांसाठी जवळपास 22,000 अर्ज दाखल झाले आहेत.
EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो - 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो - 41.9 लाख
LIG अल्प उत्पन्न गट
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख
खारकोपर ईस्ट - 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख