![HarshVardhan Sapakal: काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कोण? काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू? HarshVardhan Sapakal: काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कोण? काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू?](https://c.ndtvimg.com/2025-02/m2e6g2n8_harshvardhan-sakpal-_625x300_13_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
काँग्रेसने अखेर प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. नाना पटोले यांच्या जागी ते आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहातील. बड्या चेहऱ्यांना संधी न देता काँग्रेसने महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबले आहे. प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र यांच्या ऐवजी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. दिग्गजांना मागे टाकत प्रदेशाध्यक्षपद पटकवणारे हर्षवर्धन सपकाळ हे नक्की कोण आहेत? त्यांची राजकी कारकीर्द कशी होती? यावर एक नजर टाकूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सपकाळ यांची गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रीय झाले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी.पी.एड पदवी घेतली आहे. ते शेतकरी कुटूंबातून आलेले आहेत. सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात ते पहिल्यापासून कार्यरत होते. महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलं. आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी ही त्यांनी पेलली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.
काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा त्यांनी काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.
हर्षवर्धन सकपाळ यांचा राजकीय प्रवास
- 2014 ते 19 बुलढाण्याचं प्रतिनिधित्व
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिवपदी काम
- अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावर काम
- राहुल गांधींनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सदस्य राहिलेले
- राजीव गांधींच्या काळात पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
- उत्तराखंड, पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका
- विधिमंडळ पातळीवरही अभ्यासू, आक्रमक आमदार म्हणून परिचित
- 2017 साली अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या म्हणून निलंबन
- 2019 साली संजय गायकवाडांकडून पराभव
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world