सिडकोचा आणखी एक मोठा निर्णय, पसंतीच्या घरासाठी आता...

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर होती. तोपर्यंत 26 हजार घरांसाठी तब्बल 1 लाख अर्ज करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

सिडकोने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सिडकोकडून 26 हजार घरांसाठी महागृहनिर्माण योजनेची घोषणा केली होती. माझे पसंतीचे सिडकोचे घर अशी ही योजना होती. यात आपल्याला हवे ते घर बुक करता येणार होते. या घरांसाठी विक्रमी अर्ज करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर होती. तोपर्यंत 26 हजार घरांसाठी तब्बल  1 लाख अर्ज करण्यात आले आहेत. हा प्रतिसाद पाहाता आता सिडकोने ही मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आपल्या स्वप्नातलं घर घेवू इच्छीणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. 

दसऱ्याच्या मुहर्तावर म्हणजे 12 ऑक्टोबरला सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत 26,000 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. सर्वांना परवडतील अशा दरात ही घरं उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले. सुरूवातीला याची मुदत 11 नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली. ती मुदत 11 डिसेंबरपर्यंत करण्यात आली. आता परत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. 

(नक्की वाचा: CIDCO News: माझ्या पसंतीचे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! घरांची किंमत 25 ते 30 टक्क्यांनी कमी होणार?)

घर घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना या योजने अंतर्गत अर्ज करता यावा, तसेच आवश्यक ती कागदपत्रांची जमवता यावीत यासाठी आता परत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता  अर्ज नोंदणीसाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि 100 किंवा 500 रु. मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही या पूर्वीच शिथील करण्यात आली आहे. 

अर्ज करण्यासाठी ही दुसरी मुदत वाढ देण्यात आली आहे. या काळात 26,000  घरांसाठी एक लाख अर्ज दाखल झाले आहेत. सिडकोला अपेक्षित असलेले अर्ज दाखल न झाल्यामुळेच ही दुसरी मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात या घरांच्या किंमती काय असतील हे अजूनही सिडकोने स्पष्ट केलेले नाही. किंमती स्पष्ट झाल्यानंतर यातून अनेक अर्जदार बाहेर पडण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अजूनही किंमती जाहीर केल्या जात नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र यानिमित्ताने ज्यांना कोणाला अर्ज करायचा आहे त्यांनी ही शेवटची संधी मिळणार आहे.  

Advertisement