राहुल कांबळे
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी NDTV मराठीशी बोलताना माहिती दिली की, 22 हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्याच बरोबर सर्वांचेच लक्ष्य लागून राहीलेल्या घरांच्या किंमतीबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार की नाही याबाबत नेहमीच चर्चा होते. त्याबाबतही सिंघल यांनी भाष्य केलं आहे. माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना राबवण्यात आली होती. पण त्याच्या किंमती आवाक्या बाहेर असल्याने अनेकांनी त्यात रस दाखवला नाही. शिवाय किंमती कमी करण्याची ही मागणी जोर धरू लागली होती. त्यावर आत सिंघल यांचे वक्तव्य आले आहे.
सिंघल यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सिडको कटीबद्ध आहे. घराच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारबरोबर घरांच्या किंमती कमी करण्याबाबत चर्चा करत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे नागरिकांना घरे आणखी किफायतशीर दरात मिळण्याची अपेक्षा आहे. या आधी सिडकोने घरांच्या किंमती कमी होणार नाहीत अशी भूमीका घेतली होती. पण आता किमती कमी करण्याबाबत सकारात्मक भूमीका घेतल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे सरकारबरोबर सध्या किंमती कमी करण्यावरून चर्चा सुरू आहे. त्यातून नक्कीच काही तरी सकारात्मक निर्णय होईल. किंमती कमी होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या गृहनिर्माण योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या घरांच्या हप्त्यांच्या (Installments) पद्धतीला ह्या महिन्यापासूनच सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काहींचे हाफ्ते सुरूही झाले आहेत. माझ्या पसंतीचे सिकडोचे घर या योजने अंतर्गत ज्या लोकांना घर लागले आहे त्यांना हे हाफ्ते भरावे लागणार आहेत. त्याची सुरूवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान नवी मुंबई परिसरातील घरांची मागणी लक्षात घेता लवकरच नवी लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी जवळपास 22 हजार घरांसाठी असणार आहे. घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. लवकरच याबाबतची सविस्तर प्रक्रिया आणि अर्जाची माहिती जाहीर होणार आहे. दसरा किंवा दिवाळीच्या मुर्हुर्तावर या नव्या लॉटरीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.