प्रथमेश गडकरी
सिडकोने माझ्या पसंतीचे घर ही योजना जाहीर केली. त्यात 26,000 घरांसाठी लॉटरीही काढण्यात आली. या लॉटरीत जवळपास 21,000 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले. पण घर सर्वसामान्यांचे पण दर श्रीमंतांचे असल्याने घोडं तिथचं अडलं. सिडकोने लॉटरी विजेत्यांसाठी पुढील प्रक्रीया सुरू केली. लॉटरी विजेत्यांना इरादा पत्र पाठवण्यात आली. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली गेली. त्यात यशस्वी झालेल्या विजेत्यांना कन्फर्मेशन लेटर पाठवण्यात आली. त्यात विजेत्यांना घर कन्फर्म करण्यासाठी EWS साठी 75,000 भरायचे होते. पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सिडको समोरील डोकेदुखी वाढली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा सिडको लॉटरी विजेत्यांना आहे. त्यामुळे अनेकांनी अजूनही कन्फर्मेशन अमाऊंट भरलेली नाही. तर काही जणांनी किंमती पाहून घरं सरेंडर केली आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्यासाठी सिडकोने सुरूवातीला पंधार दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण नंतर ही मुदत वाढवून 28 दिवस करण्यात आली आहे. असं असलं तरी 21,000 विजेत्यां पैकी आतापर्यंत फक्त 2,900 जणांनीच कन्फर्मेशन अमाऊंट भरली आहे. त्यामुळे सिडको समोर इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली घरं विकायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO News: सिडकोची परत एक मुदत वाढ, माझे पसंतीचे घर योजनेत नवा ट्वीस्ट
सिडको माझ्या पसंतीचे घर योजनते पहिल्या टप्प्यात 25,723 घरांची लॉटरी काढली गेली. त्या पैकी 19,518 ग्राहकांना घरांची सोडत लागली. जवळपास 11,000 विजेत्यांना कन्फर्मेशनसाठी पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्या पैकी केवळ 2,900 ग्राहकांनी रक्कम भरून बुकिंग पूर्ण केल्याचे मोर आले आहे. सिडकोने 15 फेब्रुवारीपासून 16 एप्रिलपर्यंत 11,000 ग्राहकांना बुकिंग कन्फर्मेशनसाठी पत्रे पाठवली होती. तर 5,000 ग्राहकांना आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे कन्फर्मेशन पत्रे पाठवता आलेली नाहीत.
महाग घरं आणि बँक कर्ज पात्रतेच्या अडचणींमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील अनेक जण सिडकोची घरे घेण्यास असमर्थ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर, घरांची विक्री न झाल्यास सिडकोच्या आर्थिक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. 700 कोटी खर्च करूनही एजन्सी अपयशी ठरल्याचं चित्र आहे. एजन्सी देखील घर विक्रीत अपेक्षित यश मिळवू शकलेली नाही हे वास्तव आहे. तर कर्ज मंजूरीतही अडथळे येत आहेत. त्याचा ही फटका सिडकोला बसला आहे. घर बुक करणाऱ्या ग्राहकांना बँकांकडून कर्ज मिळण्यास पात्र ठरणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ग्राहक आवश्यक निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यात अडथळे येत आहेत. त्याचा फटकाही सिडकोलाच बसताना दिसत आहे.