काल बदलापूरमध्ये तरुणीचा मृत्यू, दुसऱ्याच दिवशी दिवा स्थानकात घडलं..'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

बदलापूरची घटना ताजी असतानाच आता भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी एक्सवर दिवा स्थानकातील एक धक्कादायक  व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Diva Railway Station Video
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Diva Railway Station Video : बदलापूर रेल्वे स्थानकात घाईघाईने ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचा भयंकर सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी एक्सवर दिवा स्थानकातील एक धक्कादायक  व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता की,लोकल येण्यापूर्वीच प्रवाशांची रेल्वे फटलावर प्रचंड गर्दी आहे. फलाटावरून लोकल गाडी पकडणे अशक्य असल्याने फलाटाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पटरीवर काही प्रवासी उभे आहेत.प्रवासी लोकल थांबण्याच्या आधीच जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढताना दिसत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा  व्हिडिओ दिवा रेल्वे स्थानकातील असल्याचे भाजप नेते दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे. 

एक वर्षांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकात मोठा अपघात झाला होता. या अपघाताचा दाखला देतानाच म्हात्रे यांनी दिवा स्थानकातील भयानक वास्तव समोर आणलं आहे. म्हात्रे यांनी व्हिडीओ पोस्ट केला असून या गंभीर प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा प्रवास जीवघेणा ठरत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.रोज प्रवाशांना ट्रेनमधील गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आणि डब्यांची संख्या वाढवली तरी प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी अशी स्थिती मध्य रेल्वेवर आहे. 

नक्की वाचा >> Budget 2026 : तरुणांना मिळणार रोजगाराच्या मोठ्या संधी, यंदाच्या बजेटमध्ये बेरोजगारांसाठी काय? वाचा सर्व घोषणा

इथे पाहा दिवा रेल्वे स्थानकातील धक्कादायक व्हिडीओ

प्रवासी अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी कार्यालयातील कामकाजाच्या वेळाही बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र गर्दी काही नियंत्रण येत नाही.प्रवाशांना रेल्वेला लटकूनच प्रवास करावा लागतो. कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी गाडीच्या दरवाजाजवळ उभे राहून जीव धोक्यात घालतात. प्रवाशांच्या गर्दीमुळे अनेक लोकांचा जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तरीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात मध्य रेल्वे ठोस पावले उचलताना दिसत नाहीय. 

नक्की वाचा >> Snooker Video : 2 वर्षाच्या मुलानं केले 2 वर्ल्ड रेकॉर्ड, स्नूकर खेळण्याचं टॅलेंट पाहून दिग्गज खेळाडू अवाक

वर्षभरापूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन गाड्या एकमेकांच्या जवळून जात असताना दरवाज्यात लटकणारे प्रवासी ट्रॅकवर पडून मोठा अपघात झाला होता. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली. पण या घटनेला वर्ष उलटून गेले तरी रेल्वे प्रवासातील गर्दीची समस्या मात्र जैसे थे आहे.
महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य रेल्वेचा प्रवास सुकर करण्यासाठी मेट्रो प्रमाणेच मध्य रेल्वेचे दरवाजे स्वयंचलित करण्याची घोषणा केली आहे.मात्र या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे. तोपर्यंत प्रवासादरम्यान होणारे अपघात आणि जीवघेणा प्रवास कसा थांबेल याचे उत्तर तूर्तास तरी रेल्वे प्रशासनाकडे नसल्याचे चित्र आहे. 

Advertisement