काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रविंद्र धंगेकर यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रविंद्र धंगेकर आज संध्याकाळीच ठाण्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून धंगेकर सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे.
काँग्रेस सोडताना दु:ख होत असल्याची भावना रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केली. रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं की, "पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. माझी काँग्रेस पक्षावर कसलीच नाराजी नाही. कोणत्याही नेत्यांवरही नाराजी नाही. काँग्रेसने मला भरपूर दिलं. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत."
"एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना भेटलो, त्यांनीही संपर्क साधला होता. कार्यकर्त्यांसोबत देखील याची चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांची आज भेट घेणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेणार आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेलं नाही. मात्र सत्तेशिवाय कामं होतं नाहीत असं जनतेचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंसोबत काम करायला हरकत नाही, अशी मानसिकता झाली आहे. गेल्या 35 वर्षात मला सत्तेचा लाभ मिळाला नाही. कार्यकर्त्यांची आता सत्तेसह जाण्याची भावना आहे, असंही धंगेकर यांनी म्हटलं. महापालिका निवडणूक मला लढवायची नाही, हे देखील रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं.