फॉर्म भरला नाही, तरी काँग्रेस नेत्याला लाडकी बहीण योजनेचे 7,500 कसे मिळाले? साताऱ्यात चर्चेला उधाण

सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

सुजित आंबेकर, प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Yojna) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna) सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे. मात्र साताऱ्यात या योजनेचा बोजवारा उडाला असून सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी ही योजना राबवताना गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे. त्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहेत. 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु ठरलेल्या तारखेच्या आधीच एक दिवस सरकारने भावाच्या खात्यात पैसे पाठवून चक्क भावालाच भाऊबीजेची उलट ओवाळणी राज्य सरकारने दिल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा - Haryana Elections Results 2024 हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती?

काँग्रेस नेत्याला विकत घेण्याचा प्लान, सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यांचे आरोप
काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याच्या खात्यात पैसे पाठवून त्या पदाधिकाऱ्याला विकत घेण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तरीही पैसे कसे आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.