मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News: राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले की, "लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे." तसेच, निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासने द्यावी लागतात, असेही त्यांनी नमूद केले.
बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं की, "आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास, निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिलं जातं." बाबासाहेब पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Honey Trap: महायुतीचा आमदार हनी ट्रॅपच्या जाळ्यात? अश्लील फोटो, 10 लाखांची मागणी अन्...)
यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता पुन्हा अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Jalgaon News: केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले चोरटे)
बाबासाहेब पाटील यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरू शकते. कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे दिलासा मिळतो, असे असताना त्याबाबत असे विधान गंभीर मानले जात आहे. या वादग्रस्त विधानावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.