सावधान! म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती

म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हणजेच  म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शिवाय  सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय  सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...

काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हाडाचे घर  मिळवून देण्याचे आश्वासन देत सदर अज्ञात व्यक्तींनी फसवणूक झालेल्या व्यक्तीस बनावट संकेतस्थळ  व त्यावरील उपलब्ध पेमेंट लिंकबाबत माहिती दिली व त्यांनी म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीपैकी रु. 50,000 इतकी रक्कम या बनावट संकेतस्थळावरून दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन भरून घेण्यात आली. तसेच याच बनावट संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राणांनंतर शिंदेंनी केली अडचण, म्हणाले... 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार'

म्हाडाच्या संगणकीय सोडतीकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली वापरण्यात येत आहे. ही प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आणि महत्वाचे म्हणजे पूर्णता ऑनलाइन आहे व यामुळे ही प्रणाली मानवी हस्तक्षेपास वाव देत नाही.  म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते. या प्रोफाइलमध्ये अर्जदार आपले कागदपत्र सादर (upload) करतील. या कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते व पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. यानंतरच अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील व अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'सुनेत्रा पवारांना बहिणीविरुद्ध उभं केलं ही चूक', अजित पवारांची मोठी कबुली

मात्र, फसवणूक झालेल्या व्यक्तीने ही कोणतीही प्रक्रिया न राबविता थेट अज्ञात व्यक्तींद्वारे कळविण्यात आलेल्या रकमेचा भरणा या बनावट संकेत स्थळावर केल्याचे समजले आहे.  मंडळातर्फे कळविण्यात येत आहे की https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय थेट अनामत रक्कमेची मागणी केली जात नाही. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? महाविकास आघाडीत घमासान, वाद पेटणार?

अर्ज सादर करते वेळी सोडत प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे नीट अवलोकन करून माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या रकमेइतकेच अनामत रकम उत्पन्न गटनिहाय ऑनलाइनच भरावी. तसेच ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असल्याने म्हाडा कर्मचारी अधिकारी यांचेकडून कोणत्याही प्रकारे रोख रकमेची मागणी केली जात नाही. नोंदणी ते सदनिकेचा ताबा या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच केल्या जातात. मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता https://housing.mhada.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांनी सोडतीत सहभाग घेऊ नये.