विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी आणि महायुती लागले आहेत. मात्र आघाडी आणि युती यांनी अजूनही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र मुख्यमंत्रीपदावर दावे मात्र केले जात आहेत. महायुतीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीतही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा याची चर्चासुरू झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे विधान केले आहे. शिवाय काँग्रेसकडे कोणता मुख्यमंत्रीपदा करता चेहरा आहे ते सांगावे असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून घमासान होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊतांचा दावा काय?
ठाण्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचीच री पुन्हा एकदा ओढली आहे. 2019 मध्येही मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे संजय राऊत म्हणाले. जर काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा कुठला चेहरा असेल तर त्यांनी सांगावे, असे आवाहन राऊत यांनी दिला. नाना पटोल माझे मित्र आहेत. महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे ते मी सांगतोय, असं सांगत राऊत यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले आहे. असं सांगत मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केला आहे.
नाना पटोलेंचे थेट उत्तर
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल असे नाना पटोले म्हणाले. शिवाय मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. निवडणुकीला आम्ही आघाडी म्हणूनच सामोरे जाणार आहोत. जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या शंभर जागाही निवडून येणार नाहीत असा दावा पटोले यांनी केला.
ट्रिंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...
थोरातांचं राऊतांना चिमटे
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊत यांना चिमटे काढले आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात याला काही अर्थ नाही. ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यावेळी त्यावर निर्णय होईल. काँग्रेसकडे चेहरे पण आहेत आणि ताकद ही आहे. ही वस्तूस्थिती राऊतांनी स्विकारली पाहीजे असे थोरात म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - माढ्यात ट्वीस्ट? 'तो' आमदार अजित पवारांची साथ सोडायला तयार, पण...
महाविकास आघाडीत वाद पेटणार?
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा याबाबत आता महायुतीत स्पर्धा निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीनंतर शिवसेना ठाकरे गट मुख्यमंत्रीपदाबाबत आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावेत अशी मागणीच जाहीर पणे शिवसेनेचे नेते करत आहेत. त्यातूनच संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवाय मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा उद्धव ठाकरे लपवू शकलेले नाहीत. त्यांनीही मुख्यमंत्रीपद स्विकारण्याची तयारी असल्याचे संकेत दिल्लीत दिले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world