Curry Leaves Price Hike: फोडणी झाली महाग! कोथिंबिरीसोबत फुकट मिळणारा कढीपत्त्याचा भाव वाढला

Curry Leaves Price Hike : दक्षिणेकडील राज्यांमध्ये खराब हवामानामुळे कढीपत्त्याचे उत्पादन घटले आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) बाजारात कढीपत्त्याचे दर 200 ते 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबईतील मसाला बाजारातून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. कोथिंबिरीसोबत मोफत किंवा स्वस्त दरात मिळणारा कढीपत्ता खिशाला जड झाला आहे. खराब हवामानाचा फटका बसल्याने कढीपत्त्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला असून, गृहिणींच्या फोडणीतून कढीपत्ता गायब झाला आहे.

सहसा भाज्यांच्या दरामध्ये चढ-उतार होत असतात, पण कढीपत्त्याचे दर स्थिर असतात. मात्र, यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच कढीपत्त्याच्या दराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) जो कढीपत्ता 80 ते 90 रुपये किलोने मिळायचा, त्याचे दर आता 200 ते 400 रुपयांपर्यंत वधारले आहेत. या विक्रमी दरवाढीमुळे किरकोळ विक्रेत्यांनी कढीपत्ता खरेदी करणेच बंद केले आहे.

Advertisement

दक्षिणेतील राज्यांना हवामानाचा फटका

भारतात कढीपत्त्याचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये होते. याच राज्यांतून मुंबई आणि नवी मुंबईला पुरवठा केला जातो. यावर्षी दक्षिणेकडील राज्यांमध्ये हवामान खराब असल्याने कढीपत्त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. उत्पादनाचा दर्जा चांगला नसल्यामुळे वाहतुकीदरम्यान माल खराब होत आहे, परिणामी बाजारात येणाऱ्या मालाचे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे.

(नक्की वाचा-  Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)

एपीएमसी बाजार समितीमध्ये दररोज साधारण 8 ते 10 टन कढीपत्त्याची विक्री होते. शनिवार आणि रविवारी या मालाला सर्वाधिक मागणी असते. मात्र, या शनिवारी केवळ 1800 किलो इतकीच आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी असल्याने दरांनी आभाळ गाठले आहे.

सामान्यांच्या ताटातून कढीपत्ता गायब

कढीपत्ता हा नाश्ता आणि जेवणातील फोडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, आता कोथिंबिरीसोबत तो फुकट मिळणे बंद झाले आहे. दर वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी कढीपत्ता विकणे कमी केले आहे.
 

Topics mentioned in this article