Dadar kabutar Khana News : मुंबईतील कबुतरखान्याचा वाद सध्या चांगलाच पेटला आहे. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याची अनेक उदाहरणं समोर आले आहेत. त्यानंतर मुंबई महापालिकेनं हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला होता.
मुंबई महापालिकेच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. कबुतर प्रेमी या निर्णयामुळे नाराज झाले. तर जैन समाजातील काही लोकांनी या प्रकरणात आंदोलन केलं. त्यांनी ताडपत्री लावण्यासाठीचे बांबू उखडून टाकण्याचा आणि ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं पहिल्या सुनावणीमध्ये कबुतर खान्यावरील बंदी कायम ठेवली आहे. पण, तरीही या प्रश्नाची धग अद्याप कमी झालेली नाही.
( नक्की वाचा : Pune Kabutarkhana : मुंबईनंतर पुण्यातही कबुतरांच्या खाण्यावरील बंदीचा वाद चिघळला, काय आहे कारण? )
मराठी माणसांना एकत्र करणार!
कबुतरखान्याच्या मुद्यावर मराठी माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न आता सुरु झाला आहे. मराठी एकीकरण समितीनं बुधवारी (13 ऑगस्ट) या विषयावर आंदोलनाची हाक दिली आहे. 'दादर' या फेसबुक पेजवरुन हे आवाहन करण्यात आलं आहे.
'मानव प्रेमींनी, मराठी भाषा प्रेमींनी, संस्कृती रक्षकांनी, स्थानिक महाराष्ट्र निष्टावंत लोकांनी स्वत:चे अस्तित्व दाखवून द्या!' असं आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आलंय. या विषयावर 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दादर पश्चिमेच्या कबुतरखानाच्या जवळ एकत्र येण्याचं आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आलं आहे.
मुंबई महापालिका आक्रमक
दरम्यान कबुतरखाना प्रकरणात हस्तक्षेप करण्यात सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. या निर्णयानंतर मुंबई महापालिका आक्रमक झाली आहे. दुसऱ्यांदा कबुतर खाण्यावर महानगर पालिकेने लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार देऊन गुन्हे दाखल करणार, असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय.
पहिल्यांदा लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडली होती त्यानंतर काल महानगर पालिकेकडून नवीन ताडपत्री लावण्यात आली आहे. ही ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट कायदेशीर कारवाई करणार, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच पालिकेने कबुतरखाना ताडपत्रीच्या माध्यमातून झाकण्यात आला आहे. कबुतरखाना व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी कोणी कबुतरांना खाद्य टाकतील त्यांच्यावर देखील पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात असतील. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.