राज्यामध्ये पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत असलेल्या रोजंदारी सफाई कामगारांना 27 जानेवारी 2017 च्या शासन अधिसूचने प्रमाणे किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार किमान वेतना बाबत कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. विशेष म्हणजे या कामगारांना थकबाकीही दिली जाणार आहे.
कदम म्हणाले, राज्यात विविध पोलिस ठाण्यात 1800 रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना अन्य विभागामध्ये देण्यात येत असलेले वेतन, भत्ते प्रमाणे लाभ देण्यात यावे. राज्यातील सर्वच रोजंदारी सफाई कामगारांना समान वेतन असावे. त्यानुसार गृह विभागातील रोजंदारी सफाई कामगारांनाही वेतन देण्यात यावे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. विभागातील कायम असलेल्या सफाई कामगारांना लाड -पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, असं ही ते म्हणाले.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
या कामगारांना 2017 च्या शासन निर्णयानुसार वेतन अदा करताना मागील थकबाकीही देण्यात यावी. कुठल्याही सफाई कामगारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री कदम यांनी दिल्या. बैठकीस पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे, उपसचिव रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भट, जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.