छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. शहरातील जाफरगेट येथील जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख अरमान असे या मृत मुलाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी शेख अरमान हा खेळत असताना एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला होता. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर पालकांनी अरमानचे संपूर्ण शरीर तपासले होते, परंतु त्यांना कुठेही चावा घेतल्याचे दिसले नाही. मात्र, कुत्र्याने अरमानच्या डोक्यात चावा घेतला होता आणि केसांमुळे तो चावा पालकांच्या लक्षात आला नाही.
(नक्की वाचा- Latur News: आरक्षण अन् त्या तीन आत्महत्या! तपासात जे समोर आलं त्याने सर्वच हादरले)
काही दिवसानंतर अरमानची तब्येत बिघडत चालल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान, अरमानच्या डोक्यात कुत्र्याने चावा घेतल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. उपचारादरम्यान अरमानचा आठवडाभरात दुर्दैवी मृत्यू झाला.
वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत
छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा उपद्रव यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट कुत्र्यांनी शेख अरमानचा नाहक बळी घेतला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने आणि कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.