राहुल कांबळे
घोटाळेबाज कशातून पैसा कमावतील याचा नेम नाही. कोणी जमिनीचा घोटाळा करतो, कोणी रस्त्यांचा घोटाळा करतो तर कोणी बांधकाम घोटाळा करतो. नियमांना बगल देत, कधीकधी नियमांच्या गळा आवळत हे घोटाळेबाज आपले उद्योग करत असतात. नवी मुंबईमध्ये एक नवा घोटाळा उघडकीस येतोय. घोटाळेबाजांनी कवडीचीही किंमत नसलेल्या डेब्रिजला आपल्या कमाईचे साधन बनवत घोटाळा केला आहे. या घोटाळ्यातून जी रक्कम घोटाळेबाजांनी गिळलीय ती ऐकून तुमच्या हातापायाला घाम सुटेल.
नवी मुंबईतील महापे MIDC ही अत्यंत महत्त्वाची औद्योगिक वसाहत मानली जाते. 2 हजार 469 एकरवर या एमआयडीसीचा पसारा आहे. या एमआयडीसीमध्ये अचानक डेब्रिजचे ढीग दिसायला सुरुवात झाली आहे. हे डेब्रिज इतकं आहे की त्याच्या हळूहळू टेकड्या व्हायला सुरुवात झाली आहे. या घोटाळ्याला आळा घातला नाही तर या टेकड्या पर्वतामध्ये परावर्तित झाल्या तर कोणतेही नवल वाटायला नको. आपण समजून घेऊया की हा राडारोडा घोटाळेबाजांसाठी सोन्याची कोंबडी कसा बनला आहे.
महापे एमआयडीसीमध्ये OF 12 या क्रमांकाचा एक भूखंड आहे. हा भूखंड जेम्स अँड ज्वेलर्सचा असल्याचे कागदोपत्री दिसून आले आहे. हा भूखंड मोकळा असून त्याभोवती कुंपण घातलेले आहे. भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी गेट असून त्याला टाळंही ठोकलेलं आहे. मात्र गेटच्या आत डोकावून बघितलं तर आपल्याला आतमध्ये डेब्रिजच्या टेकड्या पाहायला मिळतात. आम्ही थोडीशी पडताळणी केली असता आम्हाला कळालं की जेम्स अँड ज्वेलर्स या कंपनीला औद्योगिक लवादाने दंड ठोठावला आहे. हा दंड बेकायदेशीररित्या डेब्रिज टाकल्याप्रकरणी ठोठावण्यात आला होता. या कंपनीला तब्बल 198 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड वसूल झाला आहे की नाही याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.
घोटाळा कसा झाला ?
जेम्स अँड ज्वेलर्सच्या भूखंडावर असलेले डेब्रिज हटविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने 86 कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. 12 जानेवारी ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे डेब्रिज उचलणे अपेक्षित होते. मात्र ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत ते उचलण्यात आले नव्हते.