Deepika Padukone vs BMC : मुंबईत सध्या धुक्याची चादर पसरली असून हवेच्या ढासळत्या पातळीमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या संतापाची मोठी चर्चा रंगली होती. मुंबईची हवा आणि लहान मुलांच्या आरोग्याबाबत दीपिकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी थेट उत्तर दिले आहे. केवळ दीपिकाच नाही तर मुंबईतील प्रत्येक नागरिकाचे म्हणणे प्रशासन गांभीर्याने ऐकत असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महापौरांनी काय सांगितलं?
मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सध्या वाढलेला आहे ही वस्तुस्थिती महापौरांनी मान्य केली आहे. मात्र हा वाढता निर्देशांक रोखण्यासाठी प्रशासन शांत बसलेले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महापौरांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. मुंबईच्या प्रदूषणामागे विकासाची कामे हे एक मुख्य कारण असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
( नक्की वाचा : Iran US War: कलाम यांनी 20 वर्षांपूर्वीच दिलेला इशारा ठरतोय खरा; आखाती युद्धाने भारताची 'ती' कमजोरी जगासमोर! )
विकास आणि प्रदूषणाचे गणित
मुंबईचा कायापालट करण्यासाठी सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो, एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडीची कामे प्रगतीपथावर आहेत. एकीकडे आपल्याला मुंबईचा विकास हवा आहे, पण दुसरीकडे याच विकासकामांचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून महापौरांनी सांगितले की, सर्व बिल्डर्स आणि सरकारी यंत्रणांना कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्याच्या सूचना म्हणजेच एसओपी (SOP) पाठवण्यात आली आहे.
बिल्डर आणि सरकारी यंत्रणांना दणका
शहरातील हवेची शुद्धता राखण्यासाठी प्रशासन आता कडक पावले उचलत आहे. विविध ठिकाणी डिजिटल बोर्ड लावून एअर क्वालिटी इंडेक्सवर लक्ष ठेवले जात आहे. ज्या भागात प्रदूषणाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळेल, तिथे तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे हा नियम केवळ खासगी बिल्डरांनाच नाही, तर मेट्रोचे काम करणाऱ्या कंपन्या, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागालाही तितकाच लागू असेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
‘The city is choking': film actor Deepika Padukone flags Mumbai's AQI, mayor Ritu Tawde responds. pic.twitter.com/q7fgUtZiJe
— Richa Pinto (@richapintoi) March 13, 2026
काय होता दीपिका पदुकोणचा संताप
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने गुरुवारी, 12 मार्च रोजी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा नकाशा शेअर करत प्रशासनाला जाब विचारला होता. मुंबईतील नागरिक आणि लहान मुले या प्रदूषणात गुदमरत आहेत, हे सर्व असेच कसे काय सुरू राहू शकते, असा सवाल तिने उपस्थित केला होता. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला टॅग करत तातडीने मदत करण्याची मागणी केली होती. या सेलिब्रिटी ट्विटमुळे मुंबईच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world