मनोज सातवी, विरार
विरारमधील एका नामांकित इमारतीमध्ये घडलेली एका संतापजनक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. डिलिव्हरीसाठी आलेल्या एका तरुणाने इमारतीच्या लिफ्टमध्येच लघुशंका केल्याचे धक्कादायक कृत्य लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या परिसरातील रहिवाशांनी संबंधित डिलिव्हरी बॉयला चांगलाच चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही घटना विरारमधील एका नामांकित इमारतीत घडली, ज्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डिलिव्हरी बॉयने केलेल्या या असभ्य आणि किळसवाण्या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच, स्थानिकांनी त्वरित कारवाई करत सदर डिलिव्हरी बॉयला पकडले. त्यानंतर त्याला चांगलाच चोप देण्यात आला.
या घटनेनंतर इमारतीतील नागरिकांनी संबंधित डिलिव्हरी बॉयला बोळींज पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. डिलिव्हरीसारख्या जबाबदारीच्या कामात असताना अशा प्रकारचे असभ्य वर्तन केवळ अयोग्य आहे. या घटनेने डिलिव्हरी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर आणि त्यांच्या प्रशिक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ग्राहकांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून किमान सभ्यता आणि सार्वजनिक ठिकाणी योग्य वर्तनाची अपेक्षा केली जाते.
(नक्की वाचा- Mumbai Local Train Blast: मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण! सर्व 11 आरोपींची निर्दोष मुक्तता, 209 जणांनी गमावलेला जीव)
या प्रकरणानंतर, सुरक्षा आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून डिलिव्हरी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि त्यांच्या वर्तनावर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे आणि अशा असभ्य वर्तनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि ग्राहकांचा विश्वास कायम राहील.