Ambernath News :गुंडागर्दी खपवून घेणार नाही! अंबरनाथच्या सभेत फडणवीसांचा कुणाला इशारा? मेट्रोबाबतही मोठी घोषणा

Ambernath News : अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या  शिवसेना एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Ambernath News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथमध्ये राजकीय सभा घेतली.
अंबरनाथ:

Ambernath News : अंबरनाथच्या विकासासाठी आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं कंबर कसली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार 17 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी केवळ विकासाचा अजेंडा मांडला नाही, तर नाव न घेता महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या  शिवसेना एकनाथ शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. 


विशेष म्हणजे अंबरनाथ आणि परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मेट्रो 14 बाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली असून, यामुळे ठाणे जिल्ह्यातील दळणवळणाला नवी गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

विकासाच्या मुद्द्यावर भर आणि विरोधकांना टोला

सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी या निवडणुकीत कोणावरही वैयक्तिक टीका करण्यासाठी किंवा कोणत्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी आलेलो नाही. मी केवळ सकारात्मक मते मागण्यासाठी आणि विकासाचा लेखाजोखा मांडण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. ज्यांच्याकडे विकासाचा कोणताही ठोस अजेंडा नसतो, त्यांनाच राजकारणात तू तू मै मै करावी लागते.

भारतीय जनता पक्षाकडे कामाची स्पष्ट पावती आणि विकासाचा आराखडा तयार आहे. यापूर्वीच्या सरकारांनी शहरांच्या मूलभूत विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी आणि परवडणाऱ्या घरांच्या योजना आणून सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. गेल्या 7 दशकात जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी आम्ही मंजूर करून दाखवला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Thane Metro : ठाणेकरांनो, तयार राहा! गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो प्रवासाची काउंटडाउन सुरू, वाचा सर्व माहिती )

मेट्रो 14 चे काम लवकरच सुरु

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली. मेट्रो 14 चे काम येत्या 4 महिन्यात प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेगवान प्रवासासाठी ही मेट्रो मैलाचा दगड ठरेल असे त्यांनी सांगितले. आता जग हे सर्कुलर इकॉनॉमिकच्या दिशेने जात असून आपणही त्याच आधुनिक पद्धतीने शहरांचा विकास करत आहोत. लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच मी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे आवाहन

सरकारच्या योजनांचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. राज्यातील महिलांना केवळ लाडकी बहीण म्हणून मर्यादित न ठेवता, त्यांना लखपती दीदी बनवणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत असून,अंबरनाथमधील भगिनींनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

पारदर्शक कारभारासाठी कमळाला मत देण्याचे आवाहन

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी स्थानिक राजकारणावर कडक शब्दांत टीका केली. अंबरनाथ नगरपालिकेत पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. शहरात कोणत्याही प्रकारची गुंडागर्दी किंवा सत्तेचा अतिरेक आम्हाला मान्य नाही. अंबरनाथला गुंडागर्दीपासून मुक्त करून एक पारदर्शी पालिका प्रशासन द्यायचे आहे, त्यासाठी नागरिकांनी कमळाच्या चिन्हावर मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्यास विकासाचा वेग दुप्पट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Topics mentioned in this article