Dharashiv: तुळजाभवानी मंदिरात तंबाखू खाताय? थेट हजारो रुपयांचा दंड होणार वसूल, 24 जणांना कोटपा कायद्याचा फटका

Dharashiv News: तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या 24 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dharashiv News: तुळजाभवानी मंदिरात मोठी कारवाई"
Shri Tuljabhavani Temple Instagram

Dharashiv News: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी मंदिर प्रशासनाने आता कंबर कसली आहे. मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात एक विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये एकूण 24 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 'कोटपा' (COTPA) कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तंबाखू आणि गुटखा खाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पथकाकडून विशेष तपासणी मोहीम

जिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या पथकाने तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या मदतीने ही मोहीम राबवली. मंदिर परिसर आणि प्रशासकीय इमारतीमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखू सेवन करणारे किंवा तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या 24 व्यक्तींवर थेट कारवाई करत त्यांच्याकडून 4 हजार 650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा तक्रार

या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. मंदिर परिसरात कोणीही गुटखा किंवा तंबाखू खाताना आढळल्यास, सजग नागरिक त्याचे फोटो काढून या क्रमांकावर पाठवू शकतात. प्राप्त तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जाणार आहे.

(नक्की वाचा: RTO Rules News: सावधान! वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं आता पडणार महागात, दंड थकवल्यास RTO करणार कठोर कारवाई)

Photo Credit: NDTV Marathi

प्रशासनाचे आवाहन

मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आणि तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. भाविकांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे तसेच स्वच्छतेबाबत सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.