धारावीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. धारावीतील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धारावीत पहिल्यांदाच भव्य स्वरुपात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहेय. आज 11 ऑगस्टला संत ककय्या मार्गावरच्या श्रीगणेश विद्यामंदिर माध्यमिक शाळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. या एकदिवसीय मेळाव्यात टाटा एआयए, आयसीआयसीआय लोंबार्ड यांसारख्या बड्या विमा कंपन्या तर झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांसह विविध क्षेत्रातील सुमारे 30 कंपन्या सहभागी होणार आहेत.
रोजगार आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात कार्य करणारी सॅपिओ एनालिटिक्स कंपनी आणि (धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल)च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार थेट निवड करून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
या एकदिवसीय रोजगार मेळाव्यात बँकिंग, विमा, रिटेल, फूड डिलिव्हरी आणि इतर क्षेत्रांतील कंपन्यांचे प्रतिनिधी, धारावीतील तरुणांचे नोकरीपूर्व समुपदेशन करणार आहेत. आज रविवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुण - तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ग्राहक सेवा प्रतिनिधी, विक्री सहयोगी, तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि यांसह विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
नक्की वाचा - हात थरथरू लागले, उभेही राहाता येईना; मनोज जरांगेंची अवस्था पाहून मराठा आंदोलक चिंतेत पडले
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून धारावीत सामाजिक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यातून धारावीतील तरुणाईला रोजगाराच्या आणि कौशल्य विकासाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांतून धारावीकरांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचे प्रवक्ता यांनी दिली. तसेच एकाच छताखाली मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या एकत्र येऊन आयोजित करण्यात आलेला हा रोजगार मेळावा धारावीतील तरुणांसाठी आयुष्य बदलवणारा ठरेल, असा विश्वास प्रवक्त्याने व्यक्त केला.
डीआरपीपीएल विषयी -
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शासन आणि अडाणी समूह यांच्या भागीदारीतून संयुक्त उपक्रम असून त्याला राज्य सरकारच्या विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. धारावीकरांचे अद्ययावत घरांचे स्वप्न पूर्ण करतानाच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी डीआरपीपीएलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. दळणवळणाची अत्याधुनिक साधने, अखंडित वीज- पाणीपुरवठा, प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ परिसर यांसह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा धारावीकरांना या प्रकल्पातून दिल्या जाणार आहेत.