सातारा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता रॅलीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भोवळ आली. सभा सुरू असताना जरांगे यांनी मंचावरच बसकण मारली. जरांगे यांचे हात थरथरत होते आणि त्यांना नीट उभेही राहाता येत नव्हते. जरांगे यांच्या कमरेला स्पाँडीलिसीस बेल्ट लावलेला होता. जरांगे यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यांना उठवून स्टेजवरून खाली आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उभेही राहाता येत नव्हते. अखेर काही कार्यकर्त्यांच्या मदतीने जरांगे यांना स्टेजवरून खाली उतरवण्यात आले. जरांगे यांना NDTV च्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी सांगितले की, 'माझी पाठ दुखत असून अशक्तपणा जाणवतोय आणि माझे हातही थरथरतायत.'
त्रास होत असतानाही कार्यक्रम पूर्ण केला
मनोज जरांगे पाटील यांना सकाळपासूनच त्रास होत होता. शांतता रॅलीला सुरूवात होण्यापूर्वी जरांगे यांना अशक्तपणा जाणवत होता. छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालणंही त्यांना शक्य होत नव्हतं. सातारा शहरातील पवई नाका ते राजवाडा परिसरात या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला चांगला प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला. 3 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी जवळपास 3 तासांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांनी त्रास होत असल्याने या रॅलीमध्ये10-15 मिनिटेच बोलण्याचे ठरवलं होतं मात्र त्यांनी जवळपास 1 तास भाषण केलं. भाषण झाल्यानंतर जरांगे हे स्टेजवरच बसले होते.
'राज ठाकरेंना अडवू नका, जाब विचारायचा असेल तर गचांडी धरून...'
साताऱ्यापूर्वी जरांगे यांच्या नेतृत्वात शांतता रॅली काढण्यात आली होती. कोल्हापुरात जरांगे पाटील यांना राज ठाकरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांबाबत विचारले असता ते म्हणाले की, कोणत्याही नेत्याला मराठा आंदोलकांनी अडवू नका. राज्यात आपलं आंदोलन सध्या सुरू नाही. जर कोणाला जाब विचारायचा असेल तर मुंबईला जाऊन त्यांची गचांडी धरून जाब विचारू, एवढी ताकद मराठा समाजाची आहे.
मराठा समाजाला राजकारणात यायचं नाही. पण तुम्ही कोणताही पर्याय ठेवलाच नाही तर समाजाचा नाईलाज होईल असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्यांना आम्ही पाडू असा इशाराही या निमित्तांनी त्यांनी दिला आहे. गरीब ओबीसींचा मराठ्यांना पाठिंबा आहे असेही ते म्हणाले. सध्या राजकीय पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. या सर्व यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी आहेत. त्यांना त्यांचे पक्ष मोठे करायचे आहेत. पण मराठा काय आहे हे 29 तारखेला आंतरवालीत दिसेल असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या विरोधात जे बोलतील त्यांना आपण सोडणार नाही. राज्यातला विरोधी पक्ष किमान आरक्षणाच्या विरोधात तरी बोलत नाही. पण सत्ताधारी मात्र थेट उलट बोलत आहेत असा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणासाठी सलग एक वर्ष आंदोलन सुरू आहे. ते आजही तेवढ्याच तीव्रतेने सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या पोटात दुखत आहे. माझ्या मागे कोण आहे? आंदोलनाला पैसा कोण पुरवत आहे? यावर सरकार नजर ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपल्याला राजकारणात पडायचं नाही. तसं असतं तर आपण कधीच खासदार झालो असतो असेही जरांगे म्हणाले. सध्या आपल्यावर बोलण्यासाठी राणे आणि दरेकरांना सांगितलं गेलं आहे. मला एकटं पाडण्यासाठी सरकारचे षडयंत्र आहे. राजकारणात काही डाव खेळावे लागतात. ते डाव या राजकारण्यांनीच मला आता शिकवले आहेत. असं सांगत कोणाला पाडायचं आहे हे आमचं ठरलं आहे. दरम्यान कोल्हापुरकरांना 29 ऑगस्टला अंतरवाली सरटी येथे येण्याचं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजाच्यावतीने उमेदवार उभे करायचे की जे आरक्षण देणार नाहीत त्यांचे उमेदवार पाडायचे, याचा फैसला अंतरवाली सराटी येथील सभेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी या सभेला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world