Mumbai News : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चांगलाच वेग मिळाला असून स्थानिकांनी देखील मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाच्या दिशेने पाऊल पुढं टाकलं आहे. अदाणी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,धारावीत आतापर्यंत 2250 हून अधिक रहिवाशांसोबत भाडेकरार पूर्ण झाले आहेत. तसेच, 1023 कुटुंबांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्वच्छने घरे रिकामी केली आहेत.
'रहिवाशांकडून मिळणाऱ्या या सकारात्मक प्रतिसादामुळे पुनर्विकास प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकत आहे. काही निवडक ठिकाणी पाडकामाला सुरुवात झाली असून अद्याप सुमारे 570 झोपडया जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. यामुळे पायाभूत सुविधा आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी जागा उपलब्ध होत आहे,' अशी प्रतिक्रिया एएनडीपीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
१२ महिन्यांच्या आगाऊ भाड्याचं वितरण...
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) सचिव विपिन पालीवाल यांच्या मते, रहिवाशांचा वाढता प्रतिसाद म्हणजे, प्रकल्पासाठी सकारात्मक संकेत आहे. 'चांगल्या घरांच्या अपेक्षेने आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धारावीतील अनेक कुटुंबं स्वतःहून पुढे येत आहेत. स्वतःच्या राहत्या घरचा ताबा सोडण्याचा निर्णय घेणे, निश्चितच सोपे नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. यासाठीच आमची टीम स्थानकांच्या मदतीसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया शक्य तेवढी सुलभ आणि सुकर करण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न आहे. धारावीतील प्रत्येक पात्र रहिवाशाला हक्काचे घर देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे" अशी प्रतिक्रिया पालीवाल यांनी दिली.
पुनर्विकासासाठी घरे रिकामे करणाऱ्या कुटुंबांना, 12 महिन्यांचे आगाऊ भाडे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच, या रहिवाशांना एक महिन्याचे अतिरिक्त भाडे (ब्रोकरेज) आणि स्थलांतरासाठी एकरकमी 5000 रुपये सहाय्यता निधी देण्यात येत आहे. आत्तापर्यंत, एएनडीपीएलच्या अधिकाऱ्यांकडून 1700 हून अधिक डिमांड ड्राफ्ट्सचे वितरण करण्यात आले आहे.
घरभाड्यात दरवर्षी ५ टक्क्यांने वाढ...
यापुढील घरभाडे थेट कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून दरवर्षी या रक्कमेत 5% नी वाढ करण्यात येणार आहे. अनेक रहिवाशांकडून भाडेकरार आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जात असून स्थलांतराची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. "धारावी पुनर्विकास प्रकल्पातून, इथल्या स्थानिकांना दर्जेदार घरे, अद्ययावत पायाभूत सुविधा आणि सुरक्षित भविष्याची हमी देण्याचे आमचे ध्येय आहे. रहिवाशांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या ध्येयाच्या जवळ जाण्यास मदत होत आहे" अशा शब्दांत पालीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.