Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मनात असलेल्या विविध शंका आणि प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या धारावीकरांसाठी आता एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा सुरू झाली आहे. घराचे झालेले सर्वेक्षण, पात्रतेचे निकष, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आणि नवीन घर कधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांची अधिकृत उत्तरे देण्यासाठी 'धारावी दीदी' ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डिजिटल सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या सुविधेमुळे आता धारावीकरांना कोणत्याही अनधिकृत चर्चेवर किंवा अफवांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
24 तास उपलब्ध असणारी AI यंत्रणा
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या 'अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड' (एएनडीपीएल) या कंपनीने ही एआय सेवा सुरू केली आहे. ही यंत्रणा आठवड्याचे 7 दिवस आणि २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतरही स्थानिकांना त्यांच्या सोयीनुसार हवी ती माहिती मिळवता येणार आहे.
एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे संयमाने ऐकून घेऊन योग्य मार्गदर्शन करणे, या संकल्पनेतून या डिजिटल सेवेचे नाव 'धारावी दीदी' असे ठेवण्यात आले आहे.

व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सॲपद्वारे संवाद
धारावीतील नागरिकांना 'धारावी दीदी'शी संवाद साधण्यासाठी व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सॲपचा पर्याय देण्यात आला आहे. ज्या नागरिकांना डिजिटल माध्यमांचा जास्त वापर करता येत नाही, त्यांनाही ही प्रणाली सहज वापरता येईल अशा पद्धतीने ती विकसित केली गेली आहे.
सध्या ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये उपलब्ध असून, येत्या काही महिन्यांत तमिळ, तेलगू आणि गुजराती भाषांचाही यामध्ये समावेश केला जाणार आहे.
( नक्की वाचा : Dharavi : 5 वर्ष करमाफी, अपात्र व्यक्तींनाही घरं आणि धारावीची मालकी कुणाची? मुख्यमंत्र्यानी दिली सर्व उत्तरं )
अफवांना बसणार आळा आणि पारदर्शकता वाढणार
प्रकल्पाबाबत मिळणारी माहिती ही थेट अधिकृत प्राधिकरणाकडून येणार असल्याने कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा गैरसमजांना पूर्णपणे आळा बसणार आहे. या सुविधेमुळे पुनर्विकासाच्या प्रत्येक टप्प्याची अचूक माहिती थेट रहिवाशांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना योग्य निर्णय घेणे शक्य होईल. एएनडीपीएलच्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकद्वारे व्हिडिओ कॉल करून किंवा +91-8071579787 या क्रमांकावर व्हॉईस कॉल व व्हॉट्सॲप करून धारावीकर या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world