- धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना सन्मानपूर्वक त्यांचे नव्या घरांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार
- गणेश नगर-मेघवाडी परिसरातील 42 रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर आवश्यक आहे
- सांडपाणी वाहिनी बसविण्यासाठी झोपड्या हटविणे गरजेचे आहे.
धारावीतील रहिवाशांना सन्मानपूर्वक त्यांच्या नव्या घरांमध्ये स्थलांतरित करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती धारावी पुनर्विकास प्रकल्प ( डीआरपी) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. धारावीतील सेक्टर 1 मधील गणेश नगर - मेघवाडी परिसरातील 42 रहिवाशांना दिलेल्या नोटिसांबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. कल्याणकर यांनी याबाबत भाष्य केले आहे. धारावीतील नागरिक अनेक दशकांपासून अत्यंत दयनीय व अस्वच्छ परिस्थितीत राहत आहेत. त्यांच्यासाठी पुनर्विकास हा पर्याय नसून गरज आहे असं कल्याणकर म्हणाले. मात्र धारावी ही अत्यंत दाट लोकवस्तीची झोपडपट्टी असल्याने मोकळी जागा अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे बांधकाम सुरू करण्यासाठी काही रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर अपरिहार्य ठरते असं ही त्यांनी सांगितलं. आमचा उद्देश सुरुवातीपासूनच रहिवाशांना झोपडीतून पुनर्वसनाच्या माध्यमातून उत्तम घरांमध्ये स्थलांतरित करण्याचा आहे. असे असले तरीही, गणेश नगर - मेघवाडी किंवा रेल्वे जमिनीवरील काही ठिकाणी तात्पुरते स्थलांतर टाळता येत नाही. हे सर्व कायद्याच्या तरतुदींनुसारच करण्यात येत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तर काही हजार रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर किंवा भाडेतत्त्वावरील निवास व्यवस्था ही जवळपास 10 लाख धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या या व्यापक प्रकल्पाच्या उद्देशाला कोणताही अडथळा निर्माण करू शकत नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1.25 लाख घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लाखो नागरिकांना याचा लाभ होणार आहे. अशा मोठ्या आणि गुंतागुंतीच्या नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पांमध्ये असे निर्णय आवश्यक असतात. आमची तातडीची प्राथमिकता म्हणजे बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून पुनर्वसनाच्या घरांचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करणे आहे. असे स्पष्टीकरण देखील यावेळी त्यांनी दिले.
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित 42 रहिवाशांच्या झोपड्या हटविणे आवश्यक असून, त्या ठिकाणी 1800 मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्यात येणार आहे. ही वाहिनी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक सुविधा आहे. या संदर्भात डॉ. कल्याणकर म्हणाले, “या कुटुंबांचे स्थलांतर सुलभ होण्यासाठी आम्ही भाडे सहाय्य, मध्यस्थी शुल्क सहाय्य (ब्रोकरेज) यासह सर्वतोपरी मदत देत आहोत. सध्याच्या व्यवस्थेनुसार तळमजल्यावरील पात्र निवासी रहिवाशांना दरमहा 18,000 रुपये इतके भाडे देण्यात येत असून, स्थलांतराच्या वेळी 12 महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर दरमहा थेट भाडे देण्यात येईल. पहिल्या मजल्यांवरील पात्र निवासी रहिवाशांना दरमहा 15,000 रुपये इतके भाडे देण्यात येत असून, 12 महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे.
त्यानंतर त्यांनाही मासिक भाडे देण्यात येईल. तळमजल्यावरील पात्र व्यावसायिक रहिवाशांना त्यांच्या गाळ्याच्या कार्पेट क्षेत्रफळानुसार दर चौ.फुट 175 रुपये इतके मासिक भाडे देण्यात येत असून, 12 महिन्यांचे भाडे आगाऊ दिले जात आहे. त्यानंतर दरमहा भाडे दिले जाईल. सर्व पात्र रहिवाशांना भाड्यात दरवर्षी 5 टक्के वाढ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही वाढ संबंधित घरमालकांनी संपूर्ण रिक्त घराचा ताबा दिल्यापासून 12 महिन्यांनंतर लागू होईल,” असेही डॉ. कल्याणकर यांनी नमूद केले. तर या स्थलांतराचा उल्लेख करत ते म्हणाले, “शताब्दी नगरमधील पात्र रहिवाशांना अत्यंत सन्मानपूर्वक म्हाडाच्या संक्रमण इमारतींमध्ये ( ट्रान्झिट कॅम्प ) स्थलांतरित करण्यात येत आहे. प्रत्येक धारावी वासियाने सन्मानाने आणि सुखद आयुष्य जगावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सुरुवातीच्या टप्प्यातील या तात्पुरत्या व्यवस्था पुनर्वसनाच्या पायाभूत सुविधांचे काम वेगाने पूर्ण करण्यास मदत करणार आहेत.