Dharavi Redevelopment Project: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज (शनिवार, 10 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीत जाहीर सभा घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. धारावी पुनर्विकासाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा समाचार घेताना त्यांनी धारावीकरांना हक्काच्या घराचे आश्वासन दिले. धारावी ही कुणा खासगी व्यक्तीला दिलेली नसून ती सरकारचीच आहे, असे स्पष्ट करत त्यांनी पुनर्विकासाचा नवा रोडमॅप मांडला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
धारावीच्या पुनर्विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वर्षांपासून फक्त चर्चाच सुरू होत्या. राजीव गांधी पंतप्रधान असतानाही ही चर्चा झाली, पण त्यानंतर 30 वर्ष काहीच घडले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि राज्यात महायुती सरकार आल्यावर आम्ही प्रत्यक्ष निर्णय घेतला.
धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच हक्काचे घर मिळेल. यामधील सर्वात लहान घर 300 चौरस फुटांचे नसून ते 350 चौरस फुटांचे असेल, असा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे,असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
पाच वर्ष करमाफी
धारावीची ओळख तिथल्या लघु उद्योगांमुळे आहे. रहिवासी एका ठिकाणी आणि व्यवसाय दुसरीकडे असे चित्र आम्हाला नको आहे. त्यामुळे धारावीतील सर्व व्यवसाय याच ठिकाणी राहतील आणि त्यांना आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या सुविधा दिल्या जातील. विशेष म्हणजे, पुनर्विकास झाल्यानंतर येथील व्यवसायांना पुढील 5 वर्ष राज्य सरकारचे सर्व कर माफ केले जातील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यामुळे धारावीतील उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अपात्र रहिवाशांनाही मिळणार हक्काची घरे
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. जे रहिवासी अपात्र ठरतील, त्यांनाही सरकार घरापासून वंचित ठेवणार नाही. प्रत्येक अपात्र व्यक्तीला राहण्यासाठी हक्काचे घर दिले जाईल. पात्र आणि अपात्र अशा सर्वांचे पुनर्वसन करणारा धारावी हा पहिला प्रकल्प ठरेल. या ठिकाणी केवळ इमारती न बांधता बागा, खेळाची मैदाने आणि कोणत्याही देखभालीचा खर्च (मेन्टेन्स) लागणार नाही अशी अत्याधुनिक व्यवस्था केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली.
(नक्की वाचा : BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती )
जमीन कोणाच्याही घशात जाणार नाही
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, धारावीची जमीन कुणा खासगी विकासकाला दिलेली नाही. ही जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (DRP) दिली असून त्यात राज्य सरकार आणि SRA स्वतः हिस्सेदार आहेत. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कात सरकारची म्हणजेच पर्यायाने जनतेचीच मालकी असणार आहे.
जे लोक जमीन विकल्याच्या कंड्या पिकवत आहेत, त्यांनी स्वतःच्या सत्ताकाळात काय केले, असा सवालही त्यांनी केला. निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रत्येक धारावीकराचे आयुष्य बदलू, असंही मुख्यमंत्र्यांनी या भाषणात जाहीर केलं.