Dhirendra Shastri Sparks Controversy: नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेने आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आपल्या ‘दिव्य दरबारात' कोणत्याही असाध्य रोगावर चमत्काराने उपचार होऊ शकतात, असा दावा करत बाबांनी मृत्यूच्या दाढेतून एका मुलाला बाहेर काढल्याचे सांगितले. या दाव्यामुळे भक्त आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये वादाला तोंड फुटले आहे.
काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपल्या दरबारात एका लहान मुलाला समोर आणले. हा मुलगा तब्बल 100 दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि उपचारादरम्यान त्याचे श्वास 5 मिनिटे थांबले होते, असा दावा बाबांनी केला. पाच मिनिटे ऑक्सिजन नसतानाही केवळ बागेश्वर धामच्या कृपेने आणि रामकथेच्या सामर्थ्याने हा मुलगा जिवंत राहिला आणि बरा झाला, असे शास्त्री यांनी जाहीरपणे सांगितले. या मुलाच्या वडिलांनीही बाबांच्या पाया पडून हा केवळ चमत्कारच असल्याचे म्हटले आहे.
अंनिसचा आक्षेप: वैद्यकीय शास्त्र की चमत्कार?
बाबांच्या या दाव्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार, कोणतीही व्यक्ती 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकत नाही, मग 5 मिनिटे श्वास थांबलेला मुलगा जिवंत राहणे शक्यच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या मुलावर तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार केले असताना त्याचे श्रेय स्वतःकडे घेणे हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा : Digital Census 2026: तुमची जनगणना तुमच्या हातात! मोबाईलवरून माहिती भरा, आणि राहा निर्धास्त! वाचा सर्व माहिती )
ड्रग अँड मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन?
श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाबांनी दाखवलेला मुलगा अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्याला अशा प्रकारे मंचावर आणणे चुकीचे आहे.
या प्रकरणात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर 'ड्रग अँड मॅजिक रेमेडीज' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. "मी जेव्हाही नागपूरला येतो, तेव्हा काही ना काही लफडा नक्कीच होतो," असे म्हणत शास्त्री यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवप्रेमी संघटनांचाही रोष
केवळ चमत्काराचा दावाच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे धीरेंद्र शास्त्री वादात अडकले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून शिवप्रेमी संघटना आणि मराठा समाजाच्या वतीने नागपूरमध्ये आंदोलने केली जात आहेत. त्यातच आता या 'चमत्कार' प्रकरणामुळे वादाची ही आग अधिकच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता पोलीस आणि प्रशासन या गंभीर दाव्यांवर काय भूमिका घेते आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य दरबारावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.