Diabetes Tests: मधुमेहींना मोठा दिलासा! रक्त नाही आता श्वास सांगणार तुमचा डायबेटिस, कशी होणार टेस्ट? वाचा

Diabetes Tests News: नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केले श्वासातून मधुमेह तपासणारे 'नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस'. कसे काम करते हे उपकरण? वाचा सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Diabetes Tests News: आता श्वासावाटे होणार मधुमेहाची तपासणी?"
NDTV Marathi

Diabetes Tests News: मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी आता शरीराला सुई टोचून रक्त काढण्याची गरज उरणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी एक असे 'नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस' विकसित केले आहे, जे केवळ श्वासाच्या माध्यमातून ग्लुकोजची पातळी अचूकपणे मोजू शकते. या विशेष उपकरणाला युके (UK) डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे.

पारंपरिक तपासणी पद्धतीला फाटा

भारतात मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना आपली शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून अनेकदा सुई टोचून रक्ताची चाचणी करावी लागते. ही पद्धत वेदनादायक आणि संसर्गाची भीती निर्माण करणारी असते. या समस्येवर उपाय म्हणून हे आधुनिक उपकरण तयार करण्यात आले आहे. डॉ. वर्षा धुर्वे, हर्ष तिवारी आणि सबरीन बानो मन्सुरी या संशोधकांचे या उपक्रमात विशेष योगदान आहे.

Advertisement

कसे काम करते हे उपकरण?

या संशोधनाचा मुख्य आधार मानवी श्वासातील घटक आहेत. संशोधनानुसार जेव्हा शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा श्वासावाटे बाहेर पडणाऱ्या 'अ‍ॅसिटोन' (Acetone) वायूचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढते. हे नवीन उपकरण श्वासातील याच अ‍ॅसिटोनचे अचूक मापन करते आणि त्याचे रूपांतर ग्लुकोज रीडिंगमध्ये करते. ही प्रक्रिया पूर्णपणे वेदनारहित आणि सुरक्षित आहे. त्यामुळे नियमित तपासणीची गरज असलेल्या मधुमेह रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायक ठरणारी आहे. 

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोप लागत नाही? फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेला हा '3-3-3' नियम, येईल शांत आणि गाढ झोप)

जागतिक मान्यता आणि पुढचे पाऊल 

सध्या हे उपकरण यशस्वीरित्या विकसित झाले असून, त्याची अचूकता अधिक वाढवण्यासाठी 'कॅलिब्रेशन' आणि 'व्हॅलिडेशन'ची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच हे उपकरण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या शोधामुळे नियमित तपासणीची गरज असलेल्या लाखो मधुमेही रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून वैद्यकीय क्षेत्रात नागपूरचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.