दिवाळी तोंडावर आहे. सरकारने वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पण त्याच वेळी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर एसटीतील वेगवेगळ्या संघटनांनी संपाची तयारी सुरू केली होती. मात्र सरकारने आता एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार होते. ते एसटीसाठी परवडणारे नव्हते. त्या आधीच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनां सोबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजत करण्यात आली होती. त्यासाठी एसटी कर्मचारी संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात तोडगा काढण्यात आला आहे. शिवाय होवू घातलेला संप ही त्यामुळे टळला आहे. संघटनांच्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुला हात सोडण्यात आला आहे. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची दर महिन्याला 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय यंदा दिवाळीनिमित्ताने 6 हजार रुपये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे.
बोनस सोबतच 12 हजार 500 रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली आहे. ही उचल एसटी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. एसटी महामंडळ हे अनेक वर्ष तोट्यात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत. एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यामध्ये केला जावा अशी मागणी कित्येक वर्षापासून होत आहे. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. आता दिवाळीच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसल्याने सरकारने ही बोनस जाहीर केला आहे.