Navi Mumbai : 'अटल सेतू'वरून डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांकडून शोध सुरू

मोबाईलवरील संपर्काच्या आधारे संबंधित इसमाची ओळख डॉ. ओंकार भागवत कवितके (वय 32 वर्ष) अशी पटली. डॉ. कवितके यांची बहीण कोमल प्रमोद लंबाते नातेवाइकांसह कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, नवी मुंबई

Navi Mumbai News : देशातील समुद्रातील सर्वात लांब पूल असलेला अटल सेतूवरून मागील काही महिन्यात अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलीस पेट्रोलिंग, सुरक्षा व्यवस्था असूनही येथील आत्महत्यांच्या घटना थांबायचं नाव घेत नाही. सोमवारी एका डॉक्टरने पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 

सोमवार, 7 जुलै 2025 रोजी रात्री 9:43 वाजता अटल सेतू नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, एका इसमाने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर 11.800 किमी या बिंदूवरून खाडीत उडी मारली. पोलीस आणि बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले असता, तिथे होंडा अमेझ ही कार आणि एक iPhone मोबाईल आढळून आला. 

मोबाईलवरील संपर्काच्या आधारे संबंधित इसमाची ओळख डॉ. ओंकार भागवत कवितके (वय 32 वर्ष) अशी पटली. डॉ. कवितके यांची बहीण कोमल प्रमोद लंबाते नातेवाइकांसह कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान, रेस्क्यू टीम, अॅम्बुलन्स व सागरी सुरक्षा विभागाची 'ध्रुवतारा' बोट यांच्याकडून खाडीत शोधमोहीम सुरू आहे. कोणाला संबंधित इसमाबाबत माहिती असल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अटल सेतूवरील आत्महत्यांच्या आजवरच्या घटना

  • मार्च 2024: पहिली घटना  43 वर्षीय महिला डॉक्टर किंजल शहा यांनी 18 मार्च 2024 रोजी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली.
  • जुलै 2024: 38 वर्षीय अभियंता करुतुरी श्रीनिवास यांनी 24 जुलै 2024 रोजी अटल सेतूवरून उडी मारली. 
  • ऑगस्ट 2024: 17 ऑगस्ट 2024 रोजी 56 वर्षीय मुलुंड येथील रीमा पटेल यांनी अटल सेतूवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भाड्याने घेतलेल्या टॅक्सीच्या चालकाने त्यांना वाचवले. 
  • सप्टेंबर 2024: 2 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील 35 वर्षीय बँकरने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. 
  • ऑक्टोबर 2024: दोन घटनांमध्ये सुशांत चक्रवर्ती आणि फिलिप हितेश शहा यांनी आत्महत्या केली. 
     
Topics mentioned in this article