
अमजद खान
उच्च न्यायालयाने डोंबिवलीतील 65 इमारती या अनधिकृत असल्याचे सांगितले होते. शिवाय त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. या आदेशानंतरही देखील साई गॅलेक्सी या इमारतीमधील फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर गेल्या दोन महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत 3 ही रजिस्ट्रेशन ऑफीसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशनचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले आहे. यातून सर्वसामान्यांची फसवणूक सुरुच आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने डीसीपींची भेट घेत त्वरीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
65 बेकायदा बांधकाम प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे डोंबिवली शहर प्रमुख अभिजीत सावंत यांनी आज कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले की, 65 बेकायदा इमारत प्रकरणा मागचा जो आका आहे, त्याच्या शोधण्याकरीता डीपीसींना निवेदन दिले आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ही बेकायदा इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याचे पुरावे डीसीपींना दिले आहेत असं त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांची चौकशी करुन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यांना तुरुंगात टाकावे. 65 बेकायदा इमारत प्रकरणात हजारो नागरीकांची फसवणूक झाल्यावरही आज देखील फसवणूक सुरु आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही बेकायदा बांधकामातील घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. डीपीसींना त्याचे पुरावे दिले आहे. गँग ऑफ डोंबिवली या मागे आहे. खोटे पेपर तयार करणारे मोठे स्कॅमर आहेत. त्याचा तपास डीसीपींनी करावा या प्रकरणी पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत. आजही रजिस्ट्रेशन कार्यालयात अधिकृत इमारतींचे पेपर लावून अनधिकृत इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन सुरु आहे. रजिस्टेशन करण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जात आहेत. त्याच्या मागे कोण आहे? त्याचा तपास डीपीसींनी करावा. त्यासाठी एसआयटी नेमावी. या संदर्भात पुरावे सादर केले. त्यात स्पष्ट दिसते आहे की, न्यायालयाच्या आदेशानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एका फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले आहे. याबाबत डीसीपी अतुल झेंडे यांची प्रतिक्रिया घेण्याच्या प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world