जाहिरात

KDMC News: कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्न चिघळला, प्रशासनाच्या भूमिकेवर सत्ताधारीच संतापले !

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे

KDMC News: कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्न चिघळला, प्रशासनाच्या भूमिकेवर सत्ताधारीच संतापले !
Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवलीच्या शिवसेना नगरसेवकांनी इशारा दिला आहे.
कल्याण:


Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे.या प्रश्नावर  डोंबिवलीत भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता कल्याण ग्रामीण भागात शिवसेनाही मैदानात उतरली आहे. फेरीवाल्यांवर तातडीने आणि ठोस कारवाई न झाल्यास थेट महापालिका मुख्यालयावर धडक देण्याचा सज्जड इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात फेरीवाल्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर होणारी कारवाई केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये संतापाची लाट आहे. 

विशेषतः 27 गावांच्या परिसरातील फेरीवाल्यांच्या त्रासामुळे शिवसेनेचे नगरसेवक गजानन पाटील यांच्यासह दोन नगरसेविकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जर प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही, तर प्रभाग कार्यालयासह केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत महायुतीमध्ये संघर्ष पेटला, भाजपाच्या एका ठरावानं शिवसेनेची झोप उडवली! )
 

फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास

कल्याण ग्रामीण भागातील लोढा हेवन, लोढा कासा रिओ आणि कोळेगाव नाका या परिसरात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. फूटपाथ तर सोडाच, पण रस्तेही या फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकले आहेत. 

या ठिकाणी आठवड्यातून 4 दिवस आठवडी बाजार भरवला जातो, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना चालणे देखील कठीण झाले आहे. या बाजारामुळे बदलापूर काटई पाईपलाईन रोडवर भीषण वाहतूक कोंडी होत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी लोढा हेवन परिसरात फेरीवाल्यांच्या मद्यावरून झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: इराण-अमेरिका युद्धाची झळ डोंबिवलीला; MIDC मधील 70% उद्योग बंद होणार? )
 

प्रशासकीय दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराचे आरोप

महापालिकेचे कारवाई पथक केवळ कारवाईचा फार्स करत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडून 'चिरीमिरी' घेऊन कर्मचारी आणि अधिकारी कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी एका फेरीवाल्याच्या अस्वच्छतेबाबतचा धक्कादायक प्रकार समोर येऊनही प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन या भागातील रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी रहिवासी आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com