जाहिरात

Dombivli News: डोंबिवलीत मोठी कारवाई! ZP ची बनावट परवानगी मिळवून बांधली इमारत; शिंदे सेनेच्या 2 नेत्यांना अटक

Dombivli News: .डोंबिवलीतील शिवसेनेच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच या घटनेनं पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Dombivli News: डोंबिवलीत मोठी कारवाई! ZP ची बनावट परवानगी मिळवून बांधली इमारत; शिंदे सेनेच्या 2 नेत्यांना अटक
Dombivli News: शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आलीय.
डोंबिवली:

Dombivli News: कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदा बांधकामांचा विषय नेहमीच चर्चेत असतो, पण आता डोंबिवलीत थेट जिल्हा परिषदेची बनावट कागदपत्रे आणि खोटे शिक्के वापरून अनधिकृत इमारत उभी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली असून, यामुळे डोंबिवलीतील राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.डोंबिवलीतील शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच या घटनेनं पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

काय आहे प्रकरण?

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2014 मध्ये झाली. सागाव-नांदिवली येथील नंदा निवास चाळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांसमोर ठेवण्यात आला होता. त्यावेळी संबंधित इमारतीला कल्याण-डोंबिवली महापालिकेची अधिकृत परवानगी असल्याचे विकासकांनी रहिवाशांना सांगितले. तसेच प्रत्येक रहिवाशाला 350 चौरस फुटांचे घर विनामूल्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नंतर केवळ 300 चौरस फुटांचे घर देण्यात येणार असून, वाढीव क्षेत्रफळासाठी वेगळी रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले.

( नक्की वाचा : Latur News: लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मेहुल राठोड यांनी संपवलं स्वत:चं आयु्ष्य )
 

या प्रकरणी रिक्षाचालक बळीराम पांडुरंग जाधव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, वाढीव 265 चौरस फुटांच्या बांधकामासाठी त्यांनी कर्ज काढून तब्बल 15 लाख रुपये संबंधित बिल्डरला दिले होते. घर मिळाल्यानंतर त्यांनी यशवंत पार्क या संबंधित इमारतीच्या बांधकाम परवानगीची पडताळणी केली. त्यावेळी त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. बिल्डरनं दाखवलेली ऑगस्ट 2008 मधील जिल्हा परिषदेची बांधकाम परवानगी पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले.

जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के आणि खोट्या स्वाक्षऱ्या

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील या बांधकामासाठी जिल्हा परिषदेची बनावट परवानगी पत्रे तयार करण्यात आली होती. एवढेच नाही तर त्यावर खोटे शिक्के मारून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या होत्या. ही इमारत पूर्णपणे अधिकृत आहे असा खोटा भास निर्माण करून रहिवाशांची तसेच शासनाची मोठी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! रमेश म्हात्रेचा जामीन मंजूर कसा झाला? वाचा Inside Story )

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह चौघांना अटक

या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झालेल्या चौघांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख रामचंद्र गणपत माने, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, रामदास टेकाळे आणि मोहनलाल चौधरी यांचा समावेश आहे. रामचंद्र माने यांनी काही काळापूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता आणि त्यांच्याकडे उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मानपाडा पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com