अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli News : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत पुन्हा एकदा नागरिकांचं आरोग्य धोक्यात सापडलं आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर गेल्या वर्षी केमिकलमुळे एमआयडीसी संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला होता. आता अचानक हिरव्या रंगाचं पाणी रस्त्यावर आल्यांमुळे स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हिरवं पाणी रस्त्यावर...
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातून रासायनिक मिश्रित हिरवट पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, नाल्यातून येणारे पाणी हिरव्या रंगाचे असून त्यातून रासायनिक वास येत आहे. हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी या पाण्यामुळे आरोग्याच्या त्वचेच्या तक्रारी उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे.

या परिसरात अनेक रासायनिक व लघुउद्योग कार्यरत असल्याने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित उद्योगांकडून प्रक्रिया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world