Dombivli News : डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर आणि परिचारिकांना रुग्णालयात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर 24 तास उलटूनही म्हात्रेला अटक करण्यात येत नव्हती, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता. 'NDTV मराठी'नं हे प्रकरण सातत्याने लावून धरलं होतं. सर्व बाजूंनी दबाब वाढल्यानंतर म्हात्रेला अटक झाली आहे.
या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या म्हात्रेला उद्या (गुरुवार, 9 जुलै 2026) विष्णू नगर पोलीस कल्याण कोर्टात हजर करणार आहेत. या मारहाणीच्या प्रकारावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता अटक झाल्यानंतर रमेश म्हात्रेची पक्षातून हकालपट्टी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील या सरकारी रुग्णालयामध्ये लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला होता. रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून एका महिला डॉक्टरसह 2 डॉक्टर आणि 3 नर्सना मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: मलम लावले अन् आजार आणखीच वाढला; KDMC च्या हॉस्पिटलवर रुग्णाचा गंभीर आरोप, प्रकरण काय? )
या हल्ल्यादरम्यान नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनाही जबरदस्तीने पकडून ठेवले होते. या जीवघेण्या हल्ल्यानंतर रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना रडू कोसळले असून, आमच्यावर आणखी किती अन्याय करणार, असा संतप्त आणि आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात आधीच 3 आरोपींना अटक करण्यात आली असून कोर्टाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना पूर्वकल्पना दिली की, जन्मानंतर बाळाला एनआयसीयू म्हणजेच नवजात शिशु अतिदक्षता विभाग उपचारांची आवश्यकता भासू शकते.
मात्र, रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड्स आधीच रुग्णांनी भरलेले होते. त्यामुळे बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीने दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या याच सल्ल्यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि या वादाचे रूपांतर पुढे थेट डॉक्टर आणि नर्सवरील शारीरिक हल्ल्यात झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world