Dombivli News: डोंबिवलीत गुंडशाही जिंकली, डॉक्टर हरले! 'त्या' पीडित डॉक्टरचा थेट राजीनामा; शहरही सोडलं

Dombivli News: या हल्ल्यामुळे प्रचंड दहशतीखाली आलेल्या एका पीडित डॉक्टरांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी हे शहरही सोडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dombivli News: या मारहाणीनंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रचंड भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
डोंबिवली:

Dombivli News: डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या धक्कादायक प्रकारानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे प्रचंड दहशतीखाली आलेल्या एका पीडित डॉक्टरांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी हे शहरही सोडले आहे. त्या गुंडांची एवढी भीती मनात बसली आहे की, आपण आता तिथे कधीच परत जाणार नाही, अशी अत्यंत उद्विग्न आणि टोकदार प्रतिक्रिया या डॉक्टरांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला आहे.

गुंडांच्या भीतीपोटी सोडले शहर

रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रचंड भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या भयंकर अनुभवाबद्दल बोलताना पीडित डॉक्टरांनी सांगितले की, सध्या तिथे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंड प्रवृत्तीची माणसे आमच्यावर पाळत ठेवून आहेत आणि ते लोक अत्यंत धोकादायक आहेत. याच कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून शहर देखील सोडले आहे. 

Advertisement

हॉस्पिटलमधील इतर डॉक्टर कदाचित तिथे त्यांचे काम पुढे चालू ठेवू शकतील, परंतु माझ्यासाठी आता तिथे राहून काम करणे अशक्य झाले आहे. मी आता त्या ठिकाणी पुन्हा कधीही पाय ठेवणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भीती आणि उद्वेग व्यक्त केला आहे.

( नक्की वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास )
 

काय आहे प्रकरण?

हा सर्व धक्कादायक प्रकार 6 जुलै रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिचलमध्ये घडला होता. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका नवजात बाळाला उपचारासाठी तिथे आणण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग म्हणजेच एनआयसीयू पूर्णपणे फुल्ल होता. त्यामुळे तिथे असलेल्या एका महिला आणि एका पुरुष डॉक्टरांनी बाळाच्या नातेवाईकांना योग्य उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. बाळाला वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत हाच यामागील डॉक्टरांचा हेतू होता.

नगरसेवकाची दादागिरी आणि मारहाण

डॉक्टरांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी थेट शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर रमेश म्हात्रे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाले. सुरुवातीला म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी तिथे असलेल्या डॉक्टरांशी आणि इतर कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक, आता शिंदे काय कारवाई करणार? )

हा वाद सुरू असतानाच म्हात्रे यांनी मागे जाऊन मोबाईलवर बोलत असलेल्या एका महिला डॉक्टरला अत्यंत जोराने मारहाण केली, ज्यामुळे त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यामध्ये 1 डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisement

याप्रकरणी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर 5 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बुधवारी (8 जुलै 2026) संध्याकाळी म्हात्रे यांना अटक केली. मात्र अटक झाल्यानंतर काही वेळातच तब्येत बिघडल्याचे कारण पुढे आल्याने त्यांना ठाणे जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.