डोंबिवली MIDC स्फोट प्रकरणात अमुदान कंपनीचे मालक मलय मेहताची पत्नी स्नेहा मेहताला अटक करण्यात आलीय. उल्हासनगर क्राईम ब्रँचनं ही कारवाई केलीय. अमुदान कंपनीत मलय सोबत त्याची पत्नी स्नेहा देखील भागीदार आहे. या दोघांनाही उद्या (बुधवार 29 मे) कल्याणच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. मलय मेहताची पोलीस कोठडी मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे त्यालाही पत्नी स्नेहासोबत कोर्टात हजर केलं जाईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवलीत गुरुवारी झालेल्या या स्फोटात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झाले आहेत. एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीत स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. या स्फोटाची कंपनी 2 ते 3 किलोमीटर परिसरात जाणवली. परिसरातील इमारतींच्या काचा या स्फोटात फुटल्या. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
डोंबिवली एमआयडीच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. या प्रकरणाच्या दुर्घटनांचा डोंबिवलीमध्ये इतिहास आहे. 2016 साली देखील डोंबिवलीतील कंपन्यात याच प्रकारे स्फोट झाला होता. त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली होती. त्यामुळे या कंपन्या डोंबिवलीतून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी यापूर्वी देखील करण्यात आली होती.
( नक्की वाचा : डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा )
अतिधोकादायक युनिट्स तातडीनं बंद करण्यात येतील असा निर्णय आम्ही घेतलाय. त्यांनी दुसरं प्रोडक्ट सुरु करावं अथवा शहराच्या बाहेरच्या एमआयडीसीमध्ये शिफ्ट होण्याची परवानगी आम्ही त्यांना देत आहोत. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असून त्यामधील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्फोटानंतर केली आहे. डोंबिवलीत हा स्फोट झाला त्याच दिवशी त्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली.