Dombivli Pimpleshwar Temple land dispute : डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर परिसरातील जमिनीचा ताबा मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेताच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.या निर्णयानंतर मंगळवारी शिवसेनेने जल्लोष केला. त्यानंतर बुधवारी भाजपानेही मंदिरात आरती करत शक्तीप्रदर्शन केले. मात्र या दरम्यान भाजपा नेते दीपेश म्हात्रे यांनी दिलेल्या एका घोषणेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
श्रेयवादाच्या लढाईत भाजपचा शिवसेनेला टोला
पिंपळेश्वर मंदिराच्या सुमारे 4 एकर 25 गुंठे जमिनीचा प्रश्न सुटल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात आरती करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. याला उत्तर देण्यासाठी बुधवारी भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेला टोला लगावत म्हटले की, काल ते आम्हाला विसरले होते, पण आज आम्ही त्यांना विसरलो नाही.
( नक्की वाचा : पनवेलकरांची बल्ले बल्ले! कर्जत अवघ्या काही मिनिटांवर; नवा रेल्वे मार्ग ते पार्किंगपर्यंत सगळं काही 'अपडेट' )
दुर्गाडी आणि मलंगगडचा उल्लेख केल्याने खळबळ
कार्यक्रमात दीपेश म्हात्रे यांनी केवळ टोला लावूनच थांबले नाहीत, तर त्यांनी "ये तो अभी झांकी है, दुर्गाडी आणि मलंगगड बाकी आहे" असे खळबळजनक विधान केले. दुर्गाडी किल्ला आणि मलंगगड हे दोन्ही विषय अत्यंत संवेदनशील मानले जातात. म्हात्रे यांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड
पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीच्या निर्णयावरून सुरू झालेली ही लढाई आता महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फोडणारी ठरत आहे. भाजपाच्या आरतीला शिवसेना आमदार राजेश मोरे उपस्थित असले तरी, दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या विधानांमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आमदार राजेश मोरे यांनी भाजपच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला होता, मात्र ते उपलब्ध नव्हते.
(नक्की वाचा : Pune News : पुण्यातील सारसबाग 2 दिवस बंद, महापौरांची मोठी घोषणा! प्रशासनाच्या निर्णयाची चर्चा का? )
काय आहे जमिनीचा मूळ निर्णय?
राज्य सरकारने डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर परिसरातील 4 एकर 25 गुंठे जमीन मंदिर ट्रस्टच्या नावे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाचे श्रेय आपल्याच नेत्यांमुळे मिळाले असल्याचे दोन्ही बाजूंकडून सांगितले जात असून, त्यावरूनच आता डोंबिवलीच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world