Panvel Karjat Railway Line: रायगड जिल्हा आणि नवी मुंबईकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. पनवेल आणि कर्जत या दोन शहरांना जोडणारा नवा दुवा प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज होत आहे. या मार्गामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर प्रवासाचा अनुभवही अधिक वेगवान आणि सुखद होणार आहे.
2 महिन्यांत प्रवासाचं टेन्शन मिटणार
पनवेल-कर्जत या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली आणि एक आनंदाची बातमी दिली. या प्रकल्पाचं सुमारे 90 टक्के काम पूर्ण झालं असून, पुढील 2 महिन्यांत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे रायगड आणि आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे.

कसा आहे हा नवा रेल्वे मार्ग?
सुमारे 29.6 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या पनवेल ते कर्जत हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र, हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 30 ते 35 मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
( नक्की वाचा : Maharashtra School : मोठी बातमी! आता शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार? वाचा काय आहे नवा प्रस्ताव )
या मार्गावरील पाच महत्त्वाची स्टेशन्स
प्रवाशांच्या सोयीसाठी या 29.6 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 5 स्थानके उभारण्यात आली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत:
- पनवेल
- चिखले
- मोहापे
- चौक
- कर्जत
पार्किंगचा प्रश्नही सुटणार
पनवेल रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी आणि पार्किंगची मोठी समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्थानक परिसरातील सिडकोचा राखीव प्लॉट आता पार्किंगसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार असून स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
(नक्की वाचा : Bakrid 2026 : मिरारोडमध्ये बकरा विरुद्ध डुक्कर वाद! पूनम सोसायटीतील त्या घटनेनं वातावरण तापलं! वाचा सर्व अपडेट )
विकासाला मिळणार नवी गती
पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग केवळ प्रवासासाठीच नाही, तर या भागाच्या आर्थिक विकासासाठीही गेम चेंजर ठरणार आहे. या मार्गामुळे कर्जत, खोपोली आणि नवी मुंबई परिसरातील औद्योगिक तसेच निवासी विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या उर्वरित तांत्रिक कामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हिरवा कंदील मिळताच या मार्गावरून लोकल धावताना दिसेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world