Dombivli News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल सोशल मीडियावर एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादग्रस्त प्रकारानंतर डोंबिवली शहरात मनसे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या भूमित गडा नावाच्या तरुणाविरोधात रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, केवळ वरवरची कारवाई न करता या तरुणावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
हा संपूर्ण प्रकार शुक्रवारी रात्री डोंबिवलीमध्ये उघडकीस आला. भूमित गडा या तरुणाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि समस्त मराठी जनतेचा अवमान करणारा आक्षेपार्ह मजकूर स्टेटस म्हणून पोस्ट केला होता. हा प्रकार मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच शहरात तीव्र संतापाची लाट उसळली.
मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी रात्रीच रामनगर पोलीस ठाण्यात जमा झाले आणि त्यांनी या तरुणाविरोधात लेखी तक्रार नोंदवली.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
दारूच्या नशेत तरुणाने कृत्य ?
मनसेच्या वाढत्या दबावानंतर रामनगर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संबंधित संशयित तरुण भूमित गडा याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने हे आक्षेपार्ह कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. मात्र, दारूचे कारण पुढे करून अशा प्रवृत्तींना सोडले जाऊ नये, अशी ठाम भूमिका मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.
या प्रकरणावर बोलताना मनसे पदाधिकारी राहुल कामत यांनी सांगितले की, राज ठाकरे आणि मराठी माणसांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधित तरुणावर कडक स्वरूपाची फौजदारी कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाचा रविवारी मनसेकडून पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात जाऊन तीव्र पाठपुरावा केला जाणार आहे. जर पोलिसांनी ठोस पावले उचलली नाहीत, तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण वादामुळे डोंबिवलीत काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world