जाहिरात

डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिरानंतर आता 'या' मोठ्या प्रकल्पावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने, वाचा काय आहे वाद

Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात  सत्ताधारी महायुतीमधील दोन प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये विकासकामांवरून जोरदार जुंपली आहे

डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिरानंतर आता 'या' मोठ्या प्रकल्पावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने, वाचा काय आहे वाद
Dombivli News: डोंबिवलीत एका नव्या प्रकल्पावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
डोंबिवली:

Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात  सत्ताधारी महायुतीमधील दोन प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये विकासकामांवरून जोरदार जुंपली आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला जागा देण्याच्या निर्णयावरून सुरू झालेला श्रेयवाद आता थेट मोठागाव रेल्वे फाटकावरील प्रस्तावित उड्डाणपुलावरून पेटला आहे. या पुलाच्या कामासाठी तातडीने निविदा काढण्याच्या मागणीवरून दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी आमनेसामने आले आहेत.

पिंपळेश्वर मंदिराच्या जागेवरून वादाची पहिली ठिणगी

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय जाहीर होताच हा आमचाच विजय असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. यावरून डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी, वेगवेगळ्या वेळेला झालेले पूजन कार्यक्रम आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये वक्तव्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भाजपाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादात आणखीच तेल पडले.

( नक्की वाचा : डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिराच्या जागेवरून नवी ठिणगी? उदय सामंत यांच्या कानात सांगणारा 'तो' भाजपा नेता कोण? )
 

मोठागाव रेल्वे उड्डाणपुलावरून नवा संघर्ष

पिंपळेश्वर मंदिराचा वाद ताजा असतानाच आता मोठागाव रेल्वे फाटकावरील प्रस्तावित उड्डाणपूल पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. मानकोली पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही, या रेल्वे फाटकामुळे मोठागाव परिसरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत आहे. एवढेच नाही तर या ठिकाणी अपघातांचा धोकाही प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी येथील स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे.

शिवसेनेचा खासदारांचा दावा

या पुलाचे काम रखडल्याचे पाहून शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि पदाधिकारी राजेश कदम यांनी थेट केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आयुक्तांना निवेदन देऊन या पुलाच्या कामासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी केली. हा उड्डाणपूल खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मंजूर झाला असून, शिवसेनाच हा प्रकल्प पूर्णत्वास नेणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये खळबळ! क्लस्टर योजना अडवण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले; थेट राजकीय नेत्यांवर गुन्हा )

भाजपाकडूनही  जोरदार मोर्चेबांधणी

शिवसेनेच्या या पवित्र्यानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नगरसेवक  दीपेश म्हात्रे यांनी या प्रकल्पासाठी भाजपनेच सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी झालेल्या केडीएमसीच्या बैठकीतही दीपेश म्हात्रे यांनी या पुलाच्या निविदा प्रक्रियेला गती देण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून या पुलाचे श्रेय घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

एकीकडे राजकीय नेते या पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले, तरी दुसरीकडे दररोज वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करणारे डोंबिवलीकर नागरिक मात्र पक्षांचे राजकारण बाजूला ठेवून हे काम प्रत्यक्ष कधी सुरू होणार, याचीच वाट पाहत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com