Kalyan News: कल्याण पूर्वेमध्ये क्लस्टर योजनेअंतर्गत सुरू असलेल्या एका मोठ्या विकासकामात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अडथळे आणत खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाच्या एका महिला कार्यकर्त्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्याणच्या राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली असून विकासाच्या कामात अशा प्रकारे पैसे उकळले जात असल्याच्या आरोपामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणी विकासक (बिल्डर) राज चतुर्वेदी यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात क्लस्टर योजनेअंतर्गत एक मोठा गृहप्रकल्प सुरू असून सुमारे 1950 कुटुंबे या प्रकल्पाचे थेट लाभार्थी आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाच्या आशा रसाळ आणि त्यांचे पती व ठाकरे गटाचे कार्यकर्ते ऋतिक कांचन रसाळ यांनी या कामात वारंवार अडथळे निर्माण केले.
"नागरिकांना भडकावू, विकासकाम होऊ देणार नाही, आंदोलन करू" अशी धमकी देत त्यांनी पैशांची मागणी केली. तसेच महापालिकेबाहेर केलेले एक उपोषण मागे घेण्यासाठीही त्यांनी दबाव टाकून पैसे मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये उड्डाणपुलाचा वाद आणखी चिघळला! आंबेडकरांना का सोडावी लागली बैठक? वाचा Inside Story )
8 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचा आरोप
बिल्डर राज चतुर्वेदी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी मिळून कामात अडथळा न आणण्यासाठी त्यांच्याकडून सुमारे 7 लाख रुपये रोख स्वरूपात आणि 1 लाख 55 हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले आहेत. एवढेच नव्हे, तर या तिघांकडून बिल्डरकडे आणखी मोठ्या रकमेची मागणी केली जात होती.
या संपूर्ण संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचे बिल्डरने सांगितले आहे. या प्राथमिक पुराव्यांच्या आणि तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी आशा रसाळ, ऋतिक कांचन रसाळ आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी नितीन मोकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : मलंगगड मुक्तीचा सर्वात मोठा आवाज; 'या' एका निर्णयाने सुटणार वर्षानुवर्षांचा प्रलंबित प्रश्न! )
राजकीय वातावरण तापले
या संपूर्ण कारवाईनंतर कल्याणमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आशा रसाळ किंवा ऋतिक कांचन रसाळ यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज कुमार यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली आहे.
"पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जर राजकीय द्वेषातून अन्यायकारक कारवाई झाली असेल, तर त्याविरोधात पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू असून ऑडिओ क्लिपमधून काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world