Dombivli News: जिद्दीचा डोंबिवली पॅटर्न! आईच्या निधनानंतरही न खचता सोहननं CA परीक्षेत अख्ख्या देशात कमावलं नाव

ICAI CA Inter Result 2026: आईच्या निधनाचे अतीव दुःख बाजूला सारून आणि परिस्थितीवर मात करत डोंबिवलीच्या एका ध्येयवेड्या तरुणाने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
ICAI CA Inter Result 2026: सोहनच्या या यशोगाथेने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
डोंबिवली:


ICAI CA Inter Result 2026: आईच्या निधनाचे अतीव दुःख बाजूला सारून आणि परिस्थितीवर मात करत डोंबिवलीच्या एका ध्येयवेड्या तरुणाने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. डोंबिवलीच्या सोहन अनिल मांजरेकर या 23 वर्षांच्या तरुणाने सीए फायनल (CA Final) परीक्षेत संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक (AIR 3) पटकावला आहे. अवघ्या देशात डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सोहनच्या या यशोगाथेने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत, कारण या मोठ्या यशाचा आनंद पाहण्यासाठी आज त्याची आई या जगात नाही.

जिद्दीच्या जोरावर मिळवले स्थान

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) घोषित केलेल्या निकालात सोहनने 78.83% गुण मिळवून देशातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. सोहनने यापूर्वी सीए इंटरमीडिएट परीक्षेतही देशात सहावी (AIR 6) रँक मिळवली होती. त्यामुळे यंदाही टॉप 10 मध्ये येण्याचा त्याला विश्वास होता, पण थेट देशपातळीवर तिसरी रँक मिळेल, अशी अपेक्षा त्याने केली नव्हती. निकाल जाहीर होताच डोंबिवलीतील कोपर भागात राहणाऱ्या सोहनच्या घरी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

आईची उणीव आणि डोळ्यांतील अश्रू

सोहन सध्या त्याचे वडील अनिल मांजरेकर आणि मोठी बहीण शिवानी यांच्यासोबत डोंबिवलीत राहतो. 5 वर्षांपूर्वी एका आजारपणामुळे त्याची आई श्वेता मांजरेकर यांचे निधन झाले होते. मातृछत्र हरपल्यानंतरही सोहनने खचून न जाता आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. आज मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाच्या आनंदात संपूर्ण कुटुंब सामील असले, तरी आईची उणीव त्यांना प्रत्येक क्षणाला जाणवत आहे. आपल्या कष्टाचे फळ पाहायला आई हवी होती, अशी भावना कुटुंबाने व्यक्त केली.

( नक्की वाचा : Inspiring Story : बापरे! एकाच घरात राहतात 5 IPS अधिकारी; दोन सख्ख्या बहिणींच्या पराक्रमाची देशभरात का रंगतेय चर्चा? )

यशाचा कोणताही शॉर्टकट नाही

आपल्या यशाचे रहस्य सांगताना सोहन म्हणाला की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. सीए परीक्षेच्या तयारीसाठी तो दररोज 8 ते 10 तास सातत्याने अभ्यास करायचा. ध्येयापासून लक्ष विचलित न होऊ देता केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. सोहनने आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षक आणि कुटुंबाकडून मिळालेल्या खंबीर पाठिंब्याला दिले आहे.

सोहन हा सुरुवातीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. त्याचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील डॉन बॉस्को स्कूलमधून झाले असून, १० वीच्या परीक्षेत त्याने 91.8% गुण मिळवले होते. सोहनचे वडील अनिल मांजरेकर हे माटुंगा येथील एका फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात, तर बहीण शिवानी ही टीसीएस (TCS) कंपनीत कार्यरत आहे. मुलुंड येथील कोचिंग सेंटरमधून सीएची तयारी करणाऱ्या सोहनचे हे यश ठाणे जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: अकरावीमध्ये नापास झाला, पण हिंमत नाही हरला, पाणीपुरीवाल्याचा मुलगा IIT मध्ये पोहोचला )