Inspiring Story: खाकी वर्दीचा रुबाब काही वेगळाच असतो, पण जेव्हा एकाच छताखाली राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तब्बल 5 सदस्य आयपीएस अधिकारी बनतात, तेव्हा त्या कुटुंबाची संपूर्ण देशात चर्चा होणं स्वाभाविक आहे. एका अशाच खास कुटुंबाची गोष्ट सध्या सोशल मीडियापासून ते प्रशासकीय वर्तुळापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, जिथे अधिकाऱ्यांची खाणच पाहायला मिळते. या कुटुंबातील आजोबांना खाकी वर्दीमध्ये पाहून त्यांच्या दोन नात इतक्या प्रेरित झाल्या की त्यांनीही केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच यूपीएससीची कठीण परीक्षा उत्तीर्ण करून आयपीएस अधिकारी बनण्याचा पराक्रम करून दाखवला. एवढेच नाही, तर या कुटुंबात आयपीएस पती-पत्नीची एक जोडी देखील कार्यरत आहे.
कोणते आहे हे प्रेरणादायी कुटुंब?
हा अगदी स्पेशल आणि तितकाच अभिमानास्पद इतिहास घडवणारे कुटुंब आहे स्वातंत्र्यसैनिक आणि वकील बाबूराम शुक्ला यांचे. त्यांच्या कुटुंबाने खाकी वर्दीची परंपराच निर्माण केली आहे, जी गेल्या 56 वर्षांपासून अविरत सुरू आहे. या प्रवासाची सुरुवात झाली ती 1971 मध्ये आणि आता 2026 मध्येही या कुटुंबातील नवी पिढी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे.

हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेश राज्यातील भिंड जिल्ह्यातील मेहगांव येथील राहणारे आहे. या कुटुंबातील पहिले आयपीएस अधिकारी म्हणजे एस. एस. शुक्ला. त्यांनी 1971 मध्ये मध्य प्रदेश पोलिसात डीएसपी म्हणून प्रवेश केला होता आणि पुढे पदोन्नती मिळवून ते आयपीएस बनले. ते एडीजीपी पदावरून 2006 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या लहाणपणी भिंडचे पोलीस अधीक्षक खुराना यांना खाकी वर्दीत वडिलांना भेटायला येताना पाहिले होते. आठवीत असताना घेतलेला तोच ध्यास त्यांनी पुढे पूर्ण करून दाखवला.
( नक्की वाचा : Kalyan News: अकरावीमध्ये नापास झाला, पण हिंमत नाही हरला, पाणीपुरीवाल्याचा मुलगा IIT मध्ये पोहोचला )
नातीने सांभाळली भोपाळची धुरा
याच शुक्ला कुटुंबातील आयपीएस अधिकारी मिनी शुक्ला यांच्याकडे 5 जून 2026 रोजी मध्य प्रदेशच्या मोहन यादव सरकारने अतिरिक्त पोलीस उपायुक्त (झोन 2, भोपाळ) या पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मिनी शुक्ला या 2022 बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 96 वी रँक मिळवली होती. त्यांचे वडील कृष्णकांत शुक्ला यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी ग्वाल्हेरला शिफ्ट झाले होते. तिथे त्यांचे आजोबा एस. एस. शुक्ला शासकीय बंगल्यावर राहत असत. आजोबांना वर्दीमध्ये पाहूनच मिनी शुक्ला आणि त्यांची मोठी बहीण प्रियंका शुक्ला या दोन्ही सख्ख्या बहिणी आयपीएस बनण्यासाठी प्रेरित झाल्या.

कुटुंबातील अधिकाऱ्यांची फौज
या कुटुंबात केवळ दोन बहिणीच नाही, तर नात्यांचे एक मोठे जाळेच प्रशासकीय सेवेत आहे. मिनी शुक्ला यांची मोठी बहीण प्रियंका शुक्ला या 2019 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. या दोन बहिणींशिवाय कुटुंबात दुसरी आणि तिसरी आयपीएस अधिकारी म्हणून एक पती-पत्नीची जोडी कार्यरत आहे. एस. एस. शुक्ला यांचे पुतणे शशिकांत शुक्ला आणि त्यांच्या पत्नी मोनिका शुक्ला हे दोघेही सध्या मध्य प्रदेश पोलिसात डीआयजी रँकवर कार्यरत आहेत.
( नक्की वाचा : मुलांना 'या' 7 गोष्टी खोट्या बोलायला शिकवा; पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या तज्ज्ञांनी पालकांना का दिलाय हा सल्ला? )
जावई देखील प्रशासकीय सेवेत
शुक्ला कुटुंबातील दोन्ही नातींचे पती देखील यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून देशाची सेवा करत आहेत. आयपीएस मिनी शुक्ला यांचा विवाह 5 फेब्रुवारी 2026 रोजी आयएएस सुमित पांडे यांच्याशी झाला, जे सध्या एडीएम भोपाळ म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची मोठी बहीण आयपीएस प्रियंका शुक्ला यांचे पती प्रमोद तिवारी हे आयआरटीएस अधिकारी असून ते भोपाळमध्ये डीओएम म्हणून कार्यरत आहेत. एकाच कुटुंबातील 5 आयपीएस, 1 आयएएस आणि 1 आयआरटीएस अधिकारी असणारे हे देशातील सर्वात प्रेरणादायी कुटुंब मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world