अमजद खान
कल्याण-डोंबिवली परिसरातील महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील अत्याचार प्रकरण ताजे असतानाच, डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही पीडित मुली गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर आरोपी काजू निषाद हा उत्तर प्रदेशात पळून गेला होता. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे.
दुसरी घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून शुभम सरोज याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिचे वय ही पंधरा ते सोळा वर्ष सांगितले जात आहे. शुभम हा खाजगी व्हिडिओग्राफीचे काम करतो. या प्रकरणातही पीडिता गर्भवती राहिल्यावर गुन्ह्याची वाच्यता झाली. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच शुभम सरोज याला अटक केली आहे.
या दोन घटनांपूर्वी, अहिल्यानगर येथून खोपोलीला मामाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका 14 वर्षीय मुलीवर सौरभ सोनवणे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. गेल्या चोवीस तासांत डोंबिवली आणि परिसरात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कल्याण उपविभागातील पोलीस या तिन्ही प्रकरणांचा कसून तपास करत आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरले आहेत. शिवाय आरोपीं विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.