Dombivli News: डोंबिवलीत 'पाणीबाणी'! रुणवाल गार्डन्सच्या रहिवाशांचे धडक पाऊल, थेट बिल्डरवर...

सोसायट्यांचे व्यवस्थापन हस्तांतरित होऊन 3 वर्षे उलटली आहेत. तरी, बिल्डरने सोसायट्यांना स्वतंत्र पाणी मीटर दिलेले नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins
डोंबिवली:

अमजद खान 

उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यातच पाण्यासाठी अनेक ठिकाणी वणवण सुरू झाली आहे. ग्रामिण भागातली ही स्थिती असताना डोंबिवली सारख्या शहरात ही पाणी टंचाई जाणवू लागली आहे. डोंबिवली जवळील मानपाडा परिसरातील 'रुणवाल गार्डन्स' या गृहसंकुलात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार विनंती करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी सकाळी बिल्डरच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या प्रकरणी आता नागरिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहेत. बिल्डरमुळेच पाणी टंचाई होत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे.

रुणवाल रेसिडेन्सी कंपनीने मानपाडा येथे 'रुणवाल गार्डन्स' हा भव्य प्रकल्प उभारला आहे. एकूण 6 टप्प्यांत होणाऱ्या या प्रकल्पातील 3 टप्पे पूर्ण झाले आहेत. तिथे सुमारे 4,500 कुटुंबे म्हणजेच जवळपास 15,000 नागरिक वास्तव्यास आहेत. या संकुलाला MIDC कडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याचे व्यवस्थापन बिल्डरचे कर्मचारी पाहतात. पण या कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन नाही. त्याचा फटका मात्र इथल्या रहिवाशांना बसत आहे. हा पाणी प्रश्न आजचा नाही तर वारंवार निर्माण होत आहे असं इथल्या नागरिकांनी सांगितलं आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Dombivli News: डोंबिवलीतील 'तो' अनधिकृत बंगला कोणाचा? एकटी महिला प्रशासनाला भिडली, 7 दिवसांपासून आमरण उपोषण

सोसायट्यांचे व्यवस्थापन हस्तांतरित होऊन 3 वर्षे उलटली आहेत.  तरी, बिल्डरने सोसायट्यांना स्वतंत्र पाणी मीटर दिलेले नाहीत. याचा फायदा घेत बिल्डर रहिवाशांच्या वाट्याचे पाणी स्वतःच्या नवीन बांधकामासाठी वापरत असून, नागरिकांना व्यावसायिक (Commercial) दराने पाणी देऊन नफा कमवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याबाबत रुणवाल रेसिडेन्सी कंपनीची प्रतिक्रीया समोर आलेली नाही. पाणी मिळत नसल्यामुळे इथले रहिवाशी चांगलेच आक्रमक झाले आहेत.  

नक्की वाचा - Vijay Oath Ceremony: विजय यांना शपथविधीवेळी भर मंचावर राज्यपालांनी टोकले, शपथ घेताना नक्की काय घडले?

विशेषतः 'आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक' (EWS) श्रेणीतील इमारतींना गेल्या काही दिवसांपासून पाणीच देण्यात आलेले नाही. घागरभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने या नागरिकांचा संयम सुटला आहे. त्यांनी बिल्डरच्या कार्यालयाकडे धाव घेतली. बिल्डरचे कर्मचारी केवळ तांत्रिक कारणे सांगून वेळ मारून नेत असून रहिवाशांमध्ये आपापसात भांडणे लावण्याचे काम करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे हा पाणी प्रश्न कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.