- तामिळनाडूच्या नवनियुक्त मुख्यमंत्री थलापती विजय यांनी गोपनियतेची शपथ घेण्याऐवजी थेट भाषण सुरू केले
- राज्यपालांनी त्वरित हस्तक्षेप करून विजय यांना आधी शपथ पूर्ण करण्याची सूचना केली
- विजय यांची ही चूक चित्रपट पार्श्वभूमीमुळे आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे घडल्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे
Vijay oath ceremony controversy: तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात होत असतानाच, नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते 'थलापती' विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात एक मोठा पेच निर्माण झाला. उत्साहाच्या भरात विजय यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवला. खरं तर त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घ्यायची होती. मात्र त्यांनी ते बाजूला सारून थेट भाषणाला सुरुवात केली. ज्यामुळे खुद्द राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागला. भाषण नको पद आणि गोपनियतेची शपथ घ्या असं राज्यपालांनी विजय यांना सांगितलं. दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करून थेट सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचलेल्या विजय यांचा हा 'फिल्मी' अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमका प्रकार काय घडला?
शपथविधीसाठी मंचावर पोहोचताच समर्थकांच्या तुफान प्रतिसादामुळे विजय भारावून गेले होते. याच उत्साहात ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास विसरले आणि त्यांनी थेट जनसमुदायाला संबोधित करण्यास सुरुवात केली. तामिळनाडूच्या राज्यपालांनी ही चूक लक्षात येताच विजय यांना तात्काळ टोकले आणि "आधी शपथ पूर्ण करा," अशी सूचना दिली. आपली चूक लक्षात आल्यावर विजय काही काळ ओशाळले, पण त्यांनी त्वरित स्वतःला सावरत शपथविधी पूर्ण केला.
राजकीय विश्लेषकांचे मत
राजकीय विश्लेषक पुल्ला राव यांच्या मते, चित्रपट पार्श्वभूमीतून आल्यामुळे आणि योग्य ब्रीफिंग नसल्यामुळे ही तांत्रिक चूक घडली असावी. तामिळनाडूने जयललितांसारखे अनेक सिनेतारका ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेले नेते पाहिले आहेत, पण असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. अशा चुकांमुळे प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यपालांनी भर मंचावर टोकल्यावर विजय यांनी स्वताला सावरले. "मी तुमचा भाऊ आहे, मुलगा आहे," अशा भावनिक सादेसह त्यांनी जनतेचे आभार मानले. भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकण्याचे वचन देत त्यांनी पहिल्याच दिवशी धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे.
शपथ घेताच 3 मोठे निर्णय
शपथविधी पार पडताच विजय यांनी आपल्या भाषणातून 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या. सत्तेवर येताच त्यांनी वीज सवलत आणि महिला सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करून आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीवर 'श्वेतपत्रिका' काढण्याचे आश्वासन देत त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जुन्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ज्या घोषणा त्यांनी केल्या त्यात 200 युनिटपर्यंत मोफत वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी 'स्पेशल फोर्स'ची स्थापना आणि ड्रग्स कंट्रोलसाठी विशेष पथकाचे गठन करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world