Dombivli News: कल्याण-डोंबिवली परिसरातील हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून होणारे वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. डोंबिवली जवळील 'कासारिओ पालावा' या नामांकित सोसायटीत वाहनांवर सुरक्षेचे ओळखपत्र स्टिकर लावण्याच्या नियमावरून एक भयानक वाद समोर आला आहे. या वादातून एका रहिवाशाने ऑन-ड्यूटी असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वयोवृद्ध सुपरवायझरला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
काय आहे पालावा सोसायटीचा नियम?
पालावा सोसायटी प्रशासनाने रहिवाशांच्या आणि सोसायटीच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. त्यानुसार, सर्व रहिवाशांच्या वाहनांवर पालावा सोसायटीचे अधिकृत स्टिकर लावणे बंधनकारक आहे. ज्या वाहनांवर स्टिकर असते, त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून थेट प्रवेश दिला जातो. मात्र, ज्या वाहनांवर स्टिकर नसते, त्यांची गेटवर चौकशी आणि तपासणी केली जाते.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
स्टिकर नसलेली गाडी थांबवल्याने वाद
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पालावा सोसायटीच्या गेट नंबर 1 वर सुरक्षा रक्षकांनी कर्तव्यावर असताना एक वाहन थांबवले. कारण त्या वाहनावर सोसायटीचे स्टिकर नव्हते. गाडी थांबवल्यामुळे वाहनातील व्यक्ती आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद वाढत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांचे 57 वर्षीय सुपरवायझर दत्तात्रेय गाडेकर तेथे पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करत संबंधित व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. "हा सोसायटीचा अधिकृत नियम आहे आणि नियमांची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे," असे सांगत गाडेकर परिस्थिती शांत करत होते.
संतापाच्या भरात चपलेने मारहाण
सुपरवायझर गाडेकर समजावून सांगत असतानाच, आरोपी मोईन तहसीलदार याने संतापाच्या भरात सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने गाडेकर यांच्याशी हुज्जत घालत त्यांना थेट चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. 57 वर्षांच्या वयोवृद्ध सुरक्षा कर्मचाऱ्यावर जाहीरपणे झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
(नक्की वाचा- Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)
मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल
या अपमानास्पद आणि हिंसक घटनेनंतर दत्तात्रेय गाडेकर यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठून मोईन तहसीलदार विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. ज्येष्ठ सुरक्षा कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पालावा सोसायटीतील इतर सजग रहिवासी आणि सुरक्षारक्षकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.