डोंबिवली शहराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, क्रीडाप्रेम आणि आरोग्याविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन'च्या तिसऱ्या पर्वाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 'डोंबिवली शहराचा उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू झाली असून इच्छुक धावपटूंना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपली अधिकृत नोंदणी करता येणार आहे. दुर्गाष्टमीचे औचित्य साधून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘नमो रमो नवरात्री'च्या प्रांगणात या उपक्रमाच्या थीम टी-शर्ट आणि मेडलचे अनावरण करण्यात आले.
रविंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन' ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून शहरातील नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. यंदाच्या पर्वातून फिटनेस, मैत्री यासोबतच डोंबिवलीच्या संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढवावा आणि डोंबिवलीच्या एकजुटीचा उत्सव साजरा करावा."
कल्याण डोंबिवली रनर्स (KDR) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या वतीने या भव्य उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. शहरातील नागरिकांना एकत्र आणणे, राज्यातील धावपटूंना एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि धावण्याच्या माध्यमातून आरोग्य, मैत्री व बंधुभावाची भावना वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मागील दोन पर्वांमध्ये कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ६ हजार धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता, तर यंदा हा सहभागाचा आकडा १० हजारांपर्यंत नेण्यासाठी आयोजक पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचे कल्याण डोंबिवली रनर्सचे प्रतिनिधी रविंद्र सकपाळ यांनी स्पष्ट केले.
सर्व वयोगटांमधील व्यावसायिक धावपटूंसोबतच फिटनेसप्रेमी, कुटुंबे आणि मुलांपर्यंत सर्वांना या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होता यावे, यासाठी ५ वेगवेगळ्या रनिंग कॅटेगरीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये २१.१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटरच्या टाईम रनचा समावेश आहे, तर ५ किलोमीटर आणि १.६ किलोमीटरच्या फन रन श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत. टाईम रन श्रेणीतील यशस्वी विजेत्या धावपटूंसाठी तब्बल ३ लाख रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आल्याची माहिती सुरज शेट्टी यांनी दिली.
या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ८ ते १६ वयोगटातील लहान मुलांसाठी १.६ किलोमीटरची फन रन पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. लहान वयापासूनच मुलांमध्ये मैदानी उपक्रम, शिस्त, आत्मविश्वास आणि तंदुरुस्तीचे महत्त्व रुजावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनची अधिकृत मान्यता असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सहभागीला ड्राय-फिट टी-शर्ट, फिनिशर मेडल, हायड्रेशन सुविधा, अल्पोपहार, टायमिंग चिप, प्रमाणपत्र आणि डिजिटल फोटो मोफत दिले जाणार आहेत.
डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून संपूर्ण शहराला एकत्र आणणारा एक भव्य उत्सव आहे. या पर्वातून फिटनेस आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढवावा. इच्छुक स्पर्धकांनी [www.dombivlikarfriendshiprun.com]या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world