प्रवीण मुधोळकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक हजारो वस्तू सध्या नागपूरच्या शांतीवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, वस्तुसंग्रहालयाची इमारत अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या वस्तू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश मिळूनदेखील शांतीवन, चिंचोली प्रकल्प दोन वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हवा होता. परंतु तो अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे या प्रकल्पाची नोडल एजन्सी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यास म्हणजेच NIT आणि समाजकल्याण विभागाने पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशांनाही गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही, असा आरोप होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दिरंगाईमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष वापरलेल्या हजारो ऐतिहासिक वस्तू, ज्यामध्ये भारतीय संविधानाचा मूळ मसुदा टाईप करण्यासाठी वापरण्यात आलेला टायपरायटरही आहे. तो नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिल 2023 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण होणार होते. मात्र, संग्रहालयाचे काम अपूर्ण असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. 2011 साली कळमेश्वर मार्गावरील चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीसाठी शांतिवन प्रकल्पाला मान्यता मिळाली. ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पासाठी शासनाने 40 कोटींचा निधी मंजूर केला होता. 2015 मध्ये त्यापैकी 33 कोटी रुपये उपलब्धही करून देण्यात आले. संग्रहालय, विपश्यना केंद्र, भिक्खू निवास आणि आनापान सती केंद्र यांसारख्या इमारती उभ्या करण्यात आल्या, मात्र आज 14 वर्षांनंतरही प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.
तेव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की, प्रकल्पाचे सर्व काम सहा महिन्यांत पूर्ण करावे. निधीअभावी कोणतेही अडथळे येऊ नयेत. त्यानंतरच पंतप्रधान लोकार्पण करतील, असे सांगण्यात आले होते. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आतापर्यंत तीन वेळा शांतीवन, चिंचोलीला भेट देत कामाची पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रकाराला दोन वर्षे पूर्ण झाली असूनही परिस्थिती जशाची तशी आहे. त्यामुळे हे वस्तूसंग्रालय नक्की पूर्ण होणार आहे का असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. बाबासाहेबांचा कोट, चष्मा, टायपरायटर, सदरा अशा तब्बल 350 वस्तूंवर लखनऊ येथील 'नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी'मार्फत रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या वस्तू सध्या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आल्या असल्या तरी, त्यांचे योग्य जतन करण्यासाठी आवश्यक तापमान आणि सुरक्षित वातावरणाची सुविधा अद्याप चिचोलीत उपलब्ध नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वस्तू नष्ट होऊ नयेत म्हणून, केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागामार्फत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात त्यांची रासायनिक प्रक्रिया करण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊन चार वर्षे होवून गेली आहेत. त्यानंतर या वस्तू शांतीवनमधील एका खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्या तातडीने संग्रहालयात योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्यात आल्या नाहीत, तर त्या पुन्हा नष्ट होतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. डॉ. आंबेडकरांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी बाबासाहेबांच्या या वस्तू नागपूरचे धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांच्याकडे सुपूर्त केल्या होत्या. प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे या वस्तू धूळखात पडल्या असून, ऐतिहासिक वारशाच्या जतनासंबंधी शासनाची उदासीनता स्पष्टपणे समोर येते. “चिचोलीतील जुन्या इमारतीत बाबासाहेबांच्या वस्तूंचे केवळ फोटो प्रदर्शित करण्यात येत आहेत. नव्या इमारतीमध्ये आधुनिक संग्रहालय उभारण्याची योजना आहे, पण ती केव्हा पूर्ण होईल, हे कुणालाच माहिती नाही,” अशी खंत भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त आणि चिचोली संग्रहालयाचे समन्वयक संजय पाटील यांनी व्यक्त केली.
या सर्व वस्तू योग्य प्रकारे जतन केल्या पाहीजेत अशी मागणी भारतीय बौद्ध परिषदचे सचिव संजय पाटील यांनी केली आहे. या मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेले कोट, कपडे, हॅट यांचा ही समावेश आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. तो जपला गेला पाहीजे. येणाऱ्या पिढीला त्याबाबत माहिती होईल. त्यासाठी हा ठेवा महत्वाचा आहे असंही ते म्हणाले.सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण वेळत संग्राहलय पूर्ण होत नाही. त्यामुळे याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. याकडे आंबेडकरी जनतेच्या ही नजरा आणि भावना जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान, नागपूर विभागाच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी, “प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच बाबासाहेबांच्या वस्तू जनतेसाठी उपलब्ध होतील,” असे सांगितले. मात्र संग्रहालय कधी उघडले जाईल, यावर त्यांनी कोणताही स्पष्ट कालावधी दिला नाही. निधीबाबतही त्यांनी मौन बाळगले आहे.